राज्यात सवासात लाख मतदारांची ऑनलाइन नोंदणी

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। मुंबई

गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनंतर आतापर्यंत राज्यात तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी सात लाखांपेक्षा जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

मतदार नोंदणी ऑनलाइन तसेच तहसील कार्यालयात अर्ज करून (ऑफलाइन) अशा दोन पद्धतीने करता येते. ऑनलाइन अर्जांच्या बाबतीत अनेक बाबींची पडताळणी केली जाते. त्यात ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक पुरावे, छायाचित्र संगणकीय प्रणालीत अर्जदाराने भरणे आवश्यक असते. शिकाय या अर्जदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेक्हल ऑफिसर- बीएलओ) प्रत्यक्ष पत्त्यावर जाऊन पडताळणी करतात. अशा प्रकारे ऑनलाइन अर्जांची छाननी करून आवश्यक त्या बाबींची पूर्तता केलेल्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविले जाते. आतापर्यंत 12 लाख 31 हजार 27 जणांनी ऑनलाइन मतदार नोंदणी अर्ज केले असून त्यापैकी 7 लाख 17 हजार 427 मतदारांची नोंद मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

ऑफलाइन 43 लाख 51 हजार मतदारांची नोंदणी

ऑनलाइनसोबतच ऑफलाइनदेखील नोंदणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱयांच्या (एईआरओ) कार्यालयात जाऊन केली जाते. अशा प्रकारे मतदार नोंदणी अर्ज करणाऱयांची संख्या 55 लाख 75 हजार आहे. त्यापैकी 43 लाख 51 हजार 130 अर्ज मान्य करण्यात आले. 3 लाख 45 हजार 900 अर्ज विविध बाबींची पूर्तता न केल्यामुळे नाकारण्यात आले आहेत. 8 लाख 3 हजार 45 अर्जांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.