सेन्सेक्स झिंगला, पुन्हा एकदा पडला… ५५० अंकाची घसरण

सामना ऑनलाईन । मुंबई

देशात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुंबई शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील कायम राहिली आहे. शुक्रवारी बाजार पडण्यामागे जागतिक शेअर बाजारातील पडझड असल्याचे कारण देण्यात येत आहे. तरी हा संपूर्ण आठवडा हिंदुस्थानच्या गुंतवणूकदारांसाठी काळाच ठरल्याने गेल्या तीन वर्षातील हा ‘ब्लॅक वीक’ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबई शेअर बाजार गुरुवारी थोडा सावरल्यासारखे वाटत होते, त्यामुळे आठवड्याचा शेवटचा वार तरी गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण घेऊन येईल का असे वाटत असतानाच आज बाजार ५५० अंकांनी कोसळला. गेल्या आठवड्यात ३६ हजाराचा विक्रमी टप्पा गाठणारा बाजार ३३,९०० अंकांवर येऊन ठेपला आहे. तर निफ्टीही १०,४२२ अंकांवर म्हणजे १५४.५० अंकांनी खाली घसरला आहे. शेअर बाजारात निराशाजनक चित्र कायम राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

जागतिक शेअर बाजारातही निराशा…

आशियातील आठवड्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी अमेरिकाच्या शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक डाउ जोन्समध्ये शेअर विक्रीने जोर धरल्याने ४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे अमेरिकी बाजार आपल्या सध्याच्या उच्चांकावरून १० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारावर याचा परिणाम पाहायला मिळत आहे.