सोलार सायकलवरुन ७९ दिवसांत ७४२४ किलोमीटर प्रवास

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याचा विश्‍वविक्रम

मुंबई– पवई येथील आयआयटी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सुशील रेड्डी या विद्यार्थ्याने सौरऊर्जेवर (सोलार पॉवर) चालणार्‍या सायकलवरून ७९ दिवसांत ७४२४ किलोमीटर प्रवास करून विश्‍वविक्रमाची नोंद केली.

सौरऊर्जेबद्दल जनजागृती करण्यासाठी ८ मे रोजी मुंबई येथून सुशीलने हा प्रवास सुरू केला होता. त्याच्या नेतृत्वाखालील पथकात कुणाल टेलर, राजेंद्र भास्कर आणि हिमांशू सिंह या तिघांचाही समावेश होता. या प्रवासादरम्यान त्यांनी विविध शाळांमधील परिसंवाद व अन्य कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन सौरऊर्जेबाबत माहिती दिली.

सौरऊर्जेवर चालणार्‍या सायकलवरून सर्वाधिक प्रवास करणारा व्यक्ती म्हणून सुशीलचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांच्या या अविस्मरणीय प्रवासाची दखल अनेक वेबसाईट्सनी घेतली. ‘द सन पेडल राईड’ नावाचे ई-बुकही त्यांच्या या प्रवासाची माहिती देण्यासाठी प्रकाशित केले गेले आहे. या ई-बुकाच्या विक्रीतून उभा राहणारा निधी ‘हॉकी व्हिलेज इंडिया’ या नियतकालिकाला दिला जाणार आहे. त्यातून राजस्थानच्या ग्रामीण भागामधील शाळांमध्ये सोलार एनर्जी सिस्टम बसवण्यात येणार आहे.