मुंबई सुपर लीग टेबल टेनिस, दिया चितळेसाठी पिंग पॅँथर्सने लावली 38 हजारांची बोली

1

सामना ऑनलाईन, मुंबई

इलेव्हन स्पोर्टस् मुंबई सुपर लीग (एमएसएल) स्पर्धेच्या लिलावात अनेक आघाडीच्या टेबल टेनिस खेळाडूंचा समावेश असूनदेखील दिया पराग चितळेला पिंग पँथर्स संघाने 38,000 रुपयांच्या बोलीवर आपल्या संघामध्ये घेतले. नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मंगळवारी लिलाव पार पाडला.

ही स्पर्धा पुरुष, महिला, ज्युनियर मुले, ज्युनियर मुली, कॅडेट मुले आणि वेट्रन्स गटात पार पडणार आहे. लिलावात 16 वर्षीय दियावर सर्वांच्या नजरा होत्या. 10 फ्रेंचायझींना 1,05,000 रुपये लिलावासाठी देण्यात आले होते. सर्वच फ्रेंचायझींचा कल हा युवा खेळाडूंकडे होता. किंग पोंग संघाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या मधुरिका पाटकरला आपल्या संघात घेतले.

गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ असलेल्या ब्लेझिंग बॅशर्सचा संघदेखील लिलावात मागे राहिला नाही. त्यांनी जागतिक क्रमवारीत 57 व्या स्थानी (18 वर्षाखालील मुले) असलेल्या रिगन अल्बुक्युरेक्युला आपल्या संघामध्ये घेतले.

या स्पर्धेत एस, ब्लेझिंग बॅशर्स, सेंच्युरी वॉरियर्स, किंग पोंग, कूल स्मॅशर्स,फँटम स्टार्स, पिंग पँथर्स, सुप्रिम फायटर्स, द टॉपस्पिनर्स, वेस्ट कोस्ट रेंजर्स या दहा फ्रेंचायझींचा समावेश लीगमध्ये आहे. या संघांना पाच-पाचच्या दोन गटांत विभागण्यात येणार आहे. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ नंतर उपांत्य फेरीत एकमेकांसमोर असतील.