ताडदेवमधून 50 लाखांची रक्कम जप्त


सामना प्रतिनिधी। मुंबई

निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने (फ्लाइंग स्कॉड) शनिवारी ताडदेव परिसरातून 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली. फ्लाइंग स्कॉडच्या अधिकाऱयांनी संबंधितांचा जबाब नोंद केला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबईत रोकड जप्त करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्याच आठवडय़ात माहीम येथे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी 2.99 कोटी रुपये जप्त केले होते. ही घटना ताजी असतानाच ताडदेव परिसरातून 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. शनिवारी सायंकाळी मलबार हिल विधानसभेच्या फ्लाइंग स्कॉडचे अधिकारी सरप्राईज चेकिंग करत होते. ताडदेवच्या सरदार पावभाजीजवळील परिसरात एक लाल रंगाची लॅण्ड रोव्हरची तपासणी केली. त्या गाडीतून 50 लाख रुपये जप्त करण्यात आले. प्रशांत समदानी यांच्याकडे ती रकम मिळाली. त्याबाबत आयकर विभागाला कळवण्यात आले आहे. आयकर विभागाचे उपायुक्त त्याची चौकशी करत असल्याची माहिती दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.