विद्यापीठ म्हणते, उत्तरे लिहिण्यास ४० पेजेस पुरेशी

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेत ‘पुरवणी’ देण्यात येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या वर्षी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन पेपर तपासणीत  स्कॅनिंग करताना ‘पुरवण्या’ गहाळ झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे निकाल अजूनही रखडून  राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर करताना विद्यापीठाने ८० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ४० पेजेस पुरेशी असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ८० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात येते, तर २० गुण प्रॅक्टिकल, प्रोजेक्टसाठी देण्यात येतात. ८० गुणांच्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची ४० पेजेस पुरत नसल्याने हे विद्यार्थी पुरवणी घेऊन उत्तरे लिहितात. मात्र ऑनलाइन पेपर तपासणीत उत्तरपत्रिका स्कॅनिंग करताना या पुरवण्या गहाळ झाल्याचे प्रकार घडतात. या वर्षी विद्यापीठाने राखून ठेवलेल्या २३०० विद्यार्थ्यांच्या निकालात पुरवण्या गहाळ झाल्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच यापुढे पुरवणी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. याबाबत संलग्न महाविद्यालयाने आणि शैक्षणिक संस्थांना परिपत्रक पाठवण्यात आले असून द्वितीय सत्राच्या परीक्षांसाठी कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पुनर्मूल्यांकनाच्या १९ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या ४८,३६५ विद्यार्थ्यांपैकी १८,८३३ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल  http://www. mumresults.in या वेबसाइटवर पाहता येणार आहेत. यामध्ये कला शाखेचे ५१३, वाणिज्य ५५३, विधी १२१७, विज्ञान ७१८, व्यवस्थापन १९२ आणि तंत्रज्ञान शाखेच्या १५,६४१ विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. उर्वरित निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.

– २३०० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय.
– मात्र सरासरी गुण देण्याचा निर्णय जाहीर होऊन दोन आठवडे झाले तरी गुण जाहीर करण्यात आलेले नाहीत.
– जाहीर केलेल्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालात काही विद्यार्थ्यांना शून्य गुण दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ.
– विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंड.
– दिवाळीच्या सुट्टय़ांमुळे रखडलेले निकाल आणखी लटकण्याची  भीती.