अॅडमिशनचे टेन्शन गेले, मुंबई–ठाण्यात १३ नवी महाविद्यालये


सामना प्रतिनिधी । मुंबई

या वर्षी मुंबई विद्यापीठाची २२ नवीन महाविद्यालये सुरू होणार आहेत. यामध्ये मुंबईत सहा आणि ठाण्यात सात महाविद्यालयांसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. मॅनेजमेंट कौन्सिलने या निर्णयाला मंजुरी दिली. यामुळे पदवी अभ्यासक्रमांच्या हजारो जागा वाढल्याने ऍडमिशनचा तिढा सुटणार आहे.

शैक्षणिक संस्थांनी केलेल्या मागणीनुसार दरवर्षी नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव असलेला बृहत् आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. यानुसार विद्यापीठाने या वर्षी विविध अभ्यासक्रमांच्या विविध ६२ नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. यातील २२ महाविद्यालयांना शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. येणारे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये ही नवी महाविद्यालये सुरू होणार असल्यामुळे मुंबई-ठाण्यात ऍडमिशनसाठी होणारी ‘मारामार’ थांबणार आहे.

सलग्न महाविद्यालये ७९६ वर

गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या नवीन महाविद्यालयांच्या प्रस्तावांपैकी एकही कॉलेज मंजूर करण्यात आले नव्हते. त्यामुळे शैक्षणिक संस्था वेटिंग होत्या, मात्र आता मंजुरी मिळाल्याने संस्थाचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. आता मुंबई विद्यापीठ सलग्न महाविद्यालयांची संख्या 796 वर पोहोचली आहे.

मुंबई

एनकेआयएस, वडाळा (पारंपरिक)

ठाकूर रामनारायण, दहिसर (पारंपरिक)

चेंबूर नाइट कॉलेज, चेंबूर (पारंपरिक,नाइट)

लीलावती लालजी दयाल, चर्नी रोड (पारंपरिक, नाइट)

पॉल इन्स्टिटय़ूट, वांद्रे (पारंपरिक, महिला)

धीरजलाल तलकचंद शाह, मालाड (विधी)
ठाणे

पुष्पलता मढवी कॉलेज, भिवंडी (पारंपरिक)

एलआर तिवारी, मीरा रोड (पारंपरिक)

एलएल दालमिया, मीरा रोड (पारंपरिक)

भिवंडी वुमन कॉलेज (महिला, पारंपरिक)

इंद्रपाल चौगुले, भिवंडी (विधी)

एलआर तिवारी, मीरा रोड (विधी)

जीवनदीप कॉलेज, कल्याण (विधी)

अशी सुरू होणार महाविद्यालये

आर्टस्, सायन्स, कॉमर्स ११

महिला कॉलेज २

नाइट कॉलेज १

लॉ कॉलेज ७

इतर १

सहा हजार जागा वाढणार

सुरू होणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयात किमान ३०० जागा उपलब्ध असतील. त्यामुळे नवीन महाविद्यालयांमुळे सहा ते साडेसहा हजार जागा वाढतील.