विद्यापीठाचे ‘स्वच्छता अभियान’: दीपक वसावे यांना हटवले

सामना प्रतिनिधी । मुंबई

टीवायचे निकाल रखडण्यास जबाबदार असलेल्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता राजभवनातर्फे निकालासाठी संपूर्ण नवी टीम तयार करण्यात आली आहे. कुलगुरूपदी डॉ. देवानंद शिंदे आणि दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी धीरेन पटेल यांच्या नियुक्तीनंतर प्रभारी परीक्षा व मूल्यमापन संचालकपदावरील दीपक वसावे यांना हटवून त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे अर्जुन घाटुळे यांच्याकडे अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी कोणतीही पूर्वतयारी नसताना ऑनलाइन पेपर तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे विद्यापीठाचे टीवायचे निकाल रखडले आहेत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची गंभीर दखल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेतली आहे.

31 जुलै, 5 ऑगस्ट आणि आता 15 ऑगस्टची डेडलाइन उलटून गेली तरी अद्याप 140 निकाल बाकी असल्यामुळेच राजभवनातून ठोस पावले उचलली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच नवे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि परीक्षा विभागातील गोंधळाला जबाबदार धरून आता नव्या परीक्षा संचालकांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

तीन महिन्यांसाठी जबाबदारी

नवनियुक्त संचालक अर्जुन घाटुळे यांच्याकडे तीन महिन्यांसाठी कारभार सोपविण्यात आला आहे. या कालावधीत जर विद्यापीठाला पूर्ण वेळ परीक्षा व मूल्यमापन संचालक मिळाला नाही तर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. दरम्यान, परीक्षा विभागातील अंतर्गत वाद, दीपक वसावे यांनी काही दिवसांपूर्वी पदमुक्त करण्याची केलेली मागणी यामुळेच त्यांना पदावरून हटवले असल्याचे बोलले जात आहे.