विद्यापीठ निकालाचा घोळ… १५ ऑगस्टला मार्कशीट मिळणार!

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल ५ ऑगस्टपर्यंत लागतील आणि १५ ऑगस्टपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मार्कशीट हातात मिळतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. पेपर तपासणीला जाणीवपूर्वक कोणी विलंब करीत असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मुंबई विद्यापीठाच्या निकालांची ३१ जुलैची डेडलाइन उलटून गेल्याच्या प्रकरणाचे आजही विधान परिषदेत पडसाद उमटले. मुख्यमंत्री म्हणाले मुंबई विद्यापीठाने या वर्षी ऑनलाइन पेपर असेसमेंटची पद्धत आणली. या सिस्टमची आवश्यकता आहेच. मात्र ही सिस्टम लागू करण्यासाठी अनेक गोष्टींचा आढावा घेण्याची आवश्यकता होती. तेवढे प्राध्यापक आपल्याकडे आहेत का हे पाहणे आवश्यक होते. तसेच प्राध्यापकाला एक पेपर तपासायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ या ऑनलाइन असेसमेंटला लागत होता. त्यामुळे हे काम लांबले. त्यामुळे या पुढच्या वर्षी या ऑनलाइन असेसमेंटमधील त्रुटी दूर करून ही पद्धत आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आमदार संजय दत्त यांनी हरकतीच्या मुद्दा मांडला होता.

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डेस्क हवा

दरम्यान, १५ ऑगस्टपर्यंत निकाल लागण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली असली तरी १५ ऑगस्टपर्यंत निकाल लागू शकत नाहीत असे कुलगुरूंचेच म्हणणे असल्याची वस्तुस्थिती शिवसेनेचे गटनेते ऍड. अनिल परब यांनी मांडली. हे निकाल रखडल्यामुळे जे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार आहेत त्यांचे भवितव्य अंधारात आहे. पुढील शिक्षणासाठी पालकांनी कर्ज काढले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे निकाल प्राधान्याने लागावे म्हणून स्वतंत्र डेस्क निर्माण करावे, अशी मागणी ऍड. परब यांनी केली. परदेशी शिक्षणासाठी १५ ऑगस्टपर्यंत मार्कशीट मिळण्याची आवश्यकता आहे. तोपर्यंत मार्कशीट मिळतीलच. मात्र तरीही एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश रखडला तर परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेऊ. महाराष्ट्रातील विद्यार्थी परदेशातील शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.