मुंबई विद्यापीठात निकालाचा सावळागोंधळ, विद्यार्थ्यांना अपेक्षेहून कमी गुण; पुनर्मूंल्याकनाच्या निकालास उशीर

मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये यंदा निकालात गोंधळ पाहायला मिळत आहे. अपेक्षेहून कमी गुण मिळाले असून बहुसंख्य विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याचा निकालही अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेतलेल्या विविध परीक्षांच्या निकालाबाबत विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन अडचणींचा पाढाच वाचला. युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि शीतल शेठ-देवरुखकर यांनी याबाबत विचारणा केली असता सीसीएफमधील चारपैकी तीन प्रिंटर गेला महिनाभर नादुरुस्त झाल्याचे समजले. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने निकालास उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एटीकेटीची परीक्षा घ्या – युवासेनेची मागणी

काही विद्यार्थ्यांचे निकाल विद्यार्थ्यांच्या किंवा महाविद्यालयांच्या अपुऱ्या माहितीमुळे राखून ठेवले आहेत. परिणामी, या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणास खीळ बसली आहे. त्यामुळे सर्व रखडलेले निकाल तातडीने जाहीर करावेत तसेच उशिरा जाहीर झालेल्या निकालात अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि पुनर्मूल्यांकनानंतर जाहीर निकालात अयशस्वी विद्यार्थ्यांना आवश्यक कालावधी अभ्यासासाठी देऊन एटीकेटीची परीक्षा घ्यावी, अशी आग्रही मागणी युवासेनेच्या वतीने डॉ. कारंडे यांच्याकडे करण्यात आली.