एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण – मुंबई विद्यापीठाने नेमली त्रिसदस्यीय समिती

जोशी-बेडेकर, बांदोडकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शिक्षेच्या नावाखाली केलेल्या अमानुष मारहाणीची मुंबई विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी सिनेट सदस्यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या मारहाणीच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

चेतना कॉलेजचे प्राचार्य महेश जोशी हे या समितीचे अध्यक्ष असून डहाणूकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर डोके, जे. वाटुमल साधुबेला कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत माळी हे या समितीचे सदस्य असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदस्यांनी तातडीने सदर महाविद्यालयात जाऊन मारहाणसंदर्भात चौकशी करण्याच्या सूचना विद्यापीठाने जारी केल्या आहेत. सदर समितीने या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करावी व समितीचा अहवाल त्वरित कुलसचिव प्रा. सुनील भिरूड यांना सादर करायचा आहे.

युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर, शीतल देवरुखकर-शेठ यांनी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेऊन एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सीनियर विद्यार्थ्याकडून झालेल्या मारहाणीची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आज विद्यापीठाने याप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे.

युवासेनेच्या मागणीनंतर कुलगुरूंचे आदेश

बांदोडकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, पवन जाधव, सिद्धेश धाऊस्कर आणि माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, डॉ. सुप्रिया करंडे आणि शीतल शेठदेवरुखकर, स्थानिक युवासेना पदाधिकारी किरण जाधव, जयदीप जाधव, सौरभ निकम, आरती खळे, पूजा भोसले, राज वर्मा, आकाश कदम, रितेश देशमुख, रूपेश जाधव, शार्दुल म्हाडगुत, चेतन थोरात यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त परिमंडळ– 1 गणेश गावडे यांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली.