वंचित बहुजन आघाडीच्या 37 उमेदवारांची यादी जाहीर

सामना प्रतिनिधी। मुंबई

कुटुंबाची सत्ता जाऊन सामान्यांची सत्ता येण्यासाठी आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिला होता; पण काँग्रेसने नकार दिला असे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या 37 उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. मात्र जात बघून उमेदवारी देण्याची प्रथा मोडीत काढली असे सांगणाऱया बहुजन वंचित आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करताना नावापुढे जातीचा उल्लेख केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत यादी जाहीर केली; मात्र नागपूर, सोलापूर, अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत. संभाजीनगरमध्ये एमआयएम व जनता दल(एस) हे दोन्ही पक्ष वाद मिटवून उमेदवार जाहीर करतील. वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा पाच-सहा दिवसांत जाहीर होईल असे ते म्हणाले.

यादीत दोन डॉक्टर

वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीत दोन डॉक्टरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई हॉस्पिटलमधील प्रख्यात ह्रदयरोग तज्ञ डॉ. अनिल कुमार यांचा समावेश आहे. त्यांना दक्षिण मुंबईतून, तर डॉ. संजय भोसले यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. तर मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांना भिवंडीतून उमेदवारी मिळाली आहे.

उर्वरित उमेदवारांची नावे व मतदारसंघ

धनराज वंजारी (वंजारी समाज)- वर्धा, किरण रोडगे-पाटणकर(बौद्ध)-रामटेक, एन. के. नान्हे (धीवर समाज)-भंडारा गोंदिया, डॉ. रमेश गजबे (माना आदिवासी)-गडचिरोली-चिमूर, ऍड. राजेंद्र महाडोळे (माळी) – चंद्रपूर, प्रा. प्रवीण पवार (बंजारा) – यवतमाळ-वाशिम, बळीराम सिरस्कार(माळी)- बुलडाणा, गुणवंत देवपारे (बौद्ध)-अमरावती, मोहन राठोड (बंजारा)-हिंगोली, प्रा. यशपाल भिंगे(धनगर)-नांदेड, आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (मुस्लिम)-परभणी, प्रा. विष्णू जाधव (कैकाडी) – बीड, अर्जुन सलगर (धनगर)-धाराशीव, राम गारकर (मातंग)-लातूर, अंजली रत्नाकर बावीस्कर (शिंपी)-जळगाव, नितीन कांडेलकर (कोळी)-रावेर, डॉ. शरदचंद्र वानखेडे (विश्वकर्मा)-जालना, सुमन कोळी (कोळी)- रायगड, अनिल जाधव (वडार)-पुणे, नवनाथ पडळकर(धनगर)-बारामती, ऍड. विजय मोरे (धनगर)-माढा, जयसिंग शेंडगे (धनगर)-सांगली, सहदेव एवळे (होलार)- सातारा.