शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारावर मुंबईचा झेंडा, 88 पैकी 18 पुरस्कारांवर मुंबईकरांची मोहोर

4

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशी -विदेशी खेळांत चमकदार कामगिरी साकारत महाराष्ट्राचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करणाऱया 18 मुंबईकर क्रीडापटूंनी यंदा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावत मुंबईचे क्रीडा क्षेत्रातील प्राबल्य सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे देशी मल्लखांब युरोपच्या भूमीतही रोवण्याचा पराक्रम करणारे नामवंत मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांचा यंदा ‘जीवनगौरव’ या मानाच्या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या 88 क्रीडारत्नांचा येत्या रविवार, 17 फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती पुरस्काराने बहुमान केला जाणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे रंगणाऱया या पुरस्कार वितरण सोहळय़ात राज्याच्या बहुमानात मोलाची भर टाकणारे क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू ,संघटक/कार्यकर्ते, दिव्यांग खेळाडू आणि साहसी क्रीडापटूंचा सन्मान केला जाणार आहे.

तज्ञ समितीची निवड करणार
राही सरनोबत, दीपिका जोसेफ, पूजा घाटकर या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी करून महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून त्यांना थेट शासकीय सेवेत रुजू करण्यात आले, मात्र स्पर्धा व सरावामुळे त्यांना नोकरीसाठी वेळ देता येत नसल्यामुळे त्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे. यावर विनोद तावडे यांना विचारले असता ते म्हणाले, ज्या खेळाडूंना थेट सरकारी सेवेत नोकरी देण्यात येते त्यांना खेळत असेपर्यंत कोणत्या सवलती देण्यात याव्यात तसेच खेळ सोडल्यानंतर त्यांनी काय काम करायला हवे यासाठी तज्ञ समिती निवडणार असून त्यांच्या अहवालानंतर महाराष्ट्र शासन निर्णय घेईल.

विजेत्यांची यादी
जीवनगौरव -उदय देशपांडे (मुंबई शहर,मल्लखांब)
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक –
अमेय जोशी (संभाजीनगर, जिम्नॅस्टिक्स)
सागर कुलकर्णी (संभाजीनगर, जिम्नॅस्टिक्स)
गजानन पाटील (पुणे, ऍथलेटिक्स)
मृणालिनी औरंगाबादकर (पुणे, बुद्धिबळ)
संजय माने (मुंबई, कुस्ती)
भूषण जाधव (ठाणे, तलवारबाजी)
उमेश कुलकर्णी (पुणे, तायक्वाँदो)
बाळकृष्ण भंडारी (पुणे, तायक्वाँदो)
स्वप्नील धोपाडे (अमरावती, बुद्धिबळ)
निखिल कानेटकर (पुणे, बॅडमिंटन)
सत्यप्रकाश तिवारी (मुंबई उपनगर, बॅडमिंटन)
दीपाली पाटील (पुणे, सायकलिंग)
पोपट पाटील (सांगली, कबड्डी)
राजेंद्र शेळके (सातारा, रोइंग)
डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे
(अमरावती, वॉटरपोलो)

खेळाडू
तिरंदाजी – प्रवीण जाधव, भाग्यश्री कोलते. ऍथलेटिक्स – सिद्धांत थिंगलिया, कालिदास हिरवे, मोनिका अथरे, मनीषा साळुंखे. ट्रायथलॉन – अक्षय कदम. वुशू – शुभम जाधव, श्रावणी कटके. स्केटिंग – सौरभ भावे. हॅण्डबॉल – महेश उगीले, समीक्षा इटणकर. जलतरण – श्वेजल मानकर, युगा बिरनाळे. कॅरम – पंकज पवार, मैत्रेयी गोगटे. जिम्नॅस्टिक्स – सागर सावंत, दिशा निद्रे. टेबल टेनिस – सनील शेट्टी. तलवारबाजी – अक्षय देशमुख, रोशनी मुर्तडक. बॅडमिंटन – अक्षय राऊत, नेहा पंडीत. बॉक्सिंग – भाग्यश्री पुरोहित. रोइंग – राजेंद्र सोनार, पूजा जाधव. नेमबाजी – हर्षदा निठवे. बिलियर्डस् आणि स्नूकर – ध्रुव सित्वाला, सिद्धार्थ पारीख. पॉवरलिफ्टिंग – मनोज मोरे, अपर्णा घाटे. वेटलिफ्टिंग – दीक्षा गायकवाड. शरीरसौष्ठव – दुर्गाप्रसाद दासरी. मल्लखांब – सागर ओव्हळकर. आटय़ापाटय़ा – उन्मेष शिंदे, गंगासागर शिंदे. कबड्डी – विकास काळे, सायली केरीपाळे. कुस्ती – उत्कर्ष काळे, रेश्मा माने. खोखो – अनिकेत पोटे, ऐश्वर्या सावंत. बुद्धिबळ – राकेश कुलकर्णी, रोनक साधवानी, हर्षीद राजा, सलोनी सापळे. लॉन टेनिस – ऋतुजा भोसले. व्हॉलीबॉल – प्रियांका बोरा. सायकलिंग – रवींद्र करांडे, वैष्णवी गभणे. स्क्वॉश – महेश माणगावकर, उर्वशी जोशी. क्रिकेट – स्मृती मंधाना. हॉकी – सूरज करकेरा.

खेळाडूंनी क्रीडा विभागात यायला हवे
ज्या खेळाडूंना थेट सरकारी सेवेत नोकरी देण्यात येते त्यांनी महाराष्ट्रातील युवा पिढी घडवण्यासाठी पाऊल उचलायला हवे. त्यांनी राज्याच्या क्रीडा विभागात काम करायला हवे. महसूल, सेल्स एक्साइज, गृह या पदांचा अट्टहास न करता त्यांनी क्रीडा विभागात येऊन महाराष्ट्राच्या क्रीडा विकासात मोलाची भर टाकायला हवी, असे विनोद तावडे यावेळी म्हणाले. दरम्यान, ऑनलाइन आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर क्रीडातज्ञांकडूनही तपासणी करण्यात आली. अखेर राज्य निवड समितीच्या बैठकीत पुरस्कार विजेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.