वाढदिवसाच्या दिवशी तरुणीवर बलात्कार, मैत्रिणीनेही केली बलात्काऱ्याला मदत

सामना ऑनलाईन। मुंबई

वाढदिवसाच्या दिवशी एका 27 वर्षीय तरुणीवर तिच्या मित्राने दुसऱ्या एका मैत्रिणीच्या मदतीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना वसईत घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.

पीडित तरुणीचा 13 फेब्रुवारीला वाढदिवस होता. वसईतील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने तिच्या मित्राला व मैत्रिणीलाही बोलावले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर मैत्रिणीने तिला जवळच्या एका फ्लॅटवर येण्याचा आग्रह केला. दुसऱ्या दिवशी व्हेलेंन्टाईन डे असल्याने तो साजरा करूया असे तिने पीडित तरुणीला सांगितले. त्यानंतर पीडित तरुणी तिची मैत्रीण व पुरुष मित्र त्या फ्लॅटवर गेले. तिथे गेल्यावर मैत्रिणीने तिला गुंगीचे औषध टाकलेली वाईन पिण्यास दिली. त्यानंतर मैत्रिणीने व पुरुष मित्राने तिला बेडरुममध्ये नेले. तिथे पुरुष मित्राने मैत्रिणीच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला. गुंगीच्या औषधामुळे पिडीत तरुणी अर्धवट शुद्धीत होती. मध्यरात्री तिला जाग आली. त्यानंतर मैत्रिणीने व मित्राने तिला झालेल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. नंतर ते तिघे आपआपल्या घरी गेले. रविवारी पीडित तरुणीने वाळीव पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार नोंदवली.