अजिंक्य, श्रेयसचा शतकी धमाका, मुंबईकडून कर्नाटकचा धुव्वा


सामना प्रतिनिधी, बंगळुरू

पहिल्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवणाऱ्या मुंबईच्या क्रिकेट संघाने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या लढतीतही दमदार कामगिरी करीत कर्नाटकचा 88 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईचा विजय हजारे ट्रॉफी एलिट ‘अ’ गटातील हा दुसरा विजय ठरला. कर्णधार अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यरचे धडाकेबाज शतक, पृथ्वी शॉचे अर्धशतक व शम्स मुलानीच्या 4 बळी मुंबईच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरल्या.

मुंबईकडून मिळालेल्या 363 धावांचा पाठलाग करणाऱया कर्नाटकचा डाव 45 षटकांत 274 धावांमध्येच गडगडला. डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीने 71 धावा देत 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तुषार देशपांडे व शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. कर्नाटकडून मयांक अग्रवालने सर्वाधिक 66 धावा तडकावल्या, पण त्याला काही मोठी खेळी करता आली नाही. तसेच इतर फलंदाजांनाही मुंबईच्या गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला करता आला नाही.

पुन्हा एकदा खणखणीत सलामी
त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने 362 धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे या जोडीने याही लढती शतकी सलामी देताना कर्नाटकच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी 106 धावांची दमदार भागीदारी रचली. कृष्णप्पा गौतमने पृथ्वी शॉला 60 धावांवर बाद केले, पण या खेळीत त्याने एक षटकार व आठ चौकारांची बरसात केली. तसेच अवघ्या 53 चेंडूंचा त्याने सामना केला.

216 धावांची भागीदारी
पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर जोडीने दुसऱया विकेटसाठी 216 धावांची शानदार भागीदारी रचली. अजिंक्य रहाणेने 150 चेंडूंत तीन गगनभेदी षटकार व 13 नेत्रदीपक चौकार चोपून काढताना 148 धावा फटकावल्या. श्रेयस अय्यरने 82 चेंडूंत 8 षटकार व 5 चौकारांसह 110 धावांची खेळी साकारली. दोघांच्या झंझावाती फलंदाजीमुळेच मुंबईला 50 षटकांत 5 बाद 362 धावा करता आल्या.

summary- mumbai won over karnataka in vijay hazare trophy