बेस्ट’ संप सुरूच, चौथ्या दिवशीही लाखो प्रवाशांचे हाल

‘बेस्ट’ला कंत्राटी बस पुरवणार्‍या कंत्राटी चालक-वाहकांनी गेल्या चार दिवसांपासून संप सुरू केल्याने लाखो प्रवाशांचे हाल सुरू आहेत. या संपावर अजून कोणताही तोडगा निघाला नसल्याने संप चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अचानक केलेल्या संपामुळे ‘बेस्ट’ प्रशासनाने बस पुरवठादार कंत्राटदारांना दररोज प्रतिबस पाच हजार याप्रमाणे दंड करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यामध्ये आतापर्यंतच्या संप विचारात घेता सुमारे १८ कोटींचा दंड बस पुरवठादार कंत्राटदाराकडून वसूल केला जाणार आहे.

मुंबईची दुसरी लाइफ लाइन असलेल्या ‘बेस्ट’ बस उपक्रमातील कंत्राटी चालक-वाहकांनी गेल्या चार दिवसांपासून संप केल्याने हजारो बस आगारातच उभ्या आहेत. संप शनिवारी सुरू असल्याने भाडेतत्त्वावरील 1077 बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्या नसल्याने 150लाखांहून अधिक विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, संपकरी कंत्राटी चालक व वाहकांच्या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली असून प्रत्येक कंपनीकडून एका बससाठी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार चार दिवसांत बाहेर न पडलेल्या बसेसचा 18 कोटी 17लाख 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहेत. कंत्राटदार कंपन्यांना महिनाअखेरीस देय असणार्‍या रकमेतून ही दंडाची रक्कम कापली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, बेस्टने अतिरिक्त ठरलेल्या चालकांना बोलावून शनिवारी 488 बसगाड्या चालवल्या.

लेखी आश्वासन मिळेपर्यंत संप

कंत्राटी कामगारांनी पगार वाढ, मोफत बेस्ट प्रवास, विश्रांतीस्थाने, उपाहारगृह, नैसर्गिक विधीसाठी आवश्यक सोयसुविधा, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करणे अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप करण्यात आला आहे. बस पुरवठादार कंपन्या मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी कंपनीच्या कामगारांनी हा संप पुकारला आहे. यामध्ये प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. लेखी आश्वासन मिळेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतल्यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

खासगी वाहनातून टप्पा वाहतुकीस परवानगी

बेस्टमधील कंत्राटी कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खासगी बसेस, स्कूल बसेसमधून प्रवाशांची टप्पा वाहतूक करण्यास परवानगी दिली. दरम्यान, एसटी महामंडळाने आजपासून 150 गाड्या बेस्टला उपलब्ध करून दिल्याआ हेत.