रेल्वेच्या मालमत्तेवर चोरांचा डल्ला! दोन वर्षांत 47 लाखांचे साहित्य लांबवले, 888 जणांना अटक 

चोरटय़ांनी दोन वर्षांत मध्य रेल्वेच्या तब्बल 47 लाख रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. त्याची गंभीर दखल घेत आरपीएफने तपास करत 888 जणांना अटक करत 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गाची हद्द छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत, खोपोली, कसारापर्यंत आहे. रेल्वे मार्गालगत अनेक ठिकाणी लोखंडी रूळ, ओव्हरहेड वायर, तांब्याच्या वायर आणि इतर साहित्य असते. रेल्वेचे कायदे कडक असल्याने सर्वसामान्य नागरिक त्याला हातही लावत नाहीत. पण गर्दुल्ल्यांबरोबरच भुरटे चोर रेल्वेच्या साहित्याची चोरी करतात. त्या पार्श्वभूमीवर आरपीएफने जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत चोरीच्या 518 गुह्यांची नोंद केली आहे. त्यापैकी 482 गुह्यांचा तपास पूर्ण करून 888 जणांना अटक केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषिकुमार शुक्ला यांनी दिली.

 

 2021 मध्ये सुमारे 22 लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्याने 219 गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये आरपीएफने तपास करून जवळपास 20 लाख रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

 2022 मध्ये 17 लाख 36 हजार रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्याप्रकरणी 251 गुन्हे दाखल करण्यात आले होते. चोरीला गेलेल्या मालमत्तेपैकी जवळपास 10 लाख 77 हजार रुपयांची मालमत्ता आरपीएफने जप्त केली आहे. तर 2023 मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत चोरीचे 23 गुन्हे दाखल झाले असून चोरीला गेलेल्या मालमत्तेपैकी सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.