लोकलमधली रेटारेटी टाळण्यासाठी मुंबईकरांनी लावली रांग

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई लोकलमधली गर्दी आणि त्यामुळे लटकत, लोंबकळत होणारा रेल्वेप्रवास हे मुंबईतलं सर्वसाधारण चित्र. गर्दीचा प्रचंड ओघ असूनही ट्रेनमध्ये विंडो सीट मिळवण्यासाठी प्रत्येक मुंबईकर जीवाचं रान करत असतो. त्यासाठी प्रसंगी दोन हात करायचीही त्याची तयारी असते. मात्र, या चित्राला फाटा देत मुंबईकरांनी रेल्वेसाठी रांग लावली आणि रांगेचा फायदाही अनुभवला.

लोकलमध्ये चढताना होणारी गर्दी आणि रेटारेटी टाळण्यासाठी अनेक माध्यमांनी मुंबईकरांना आवाहन केलं होतं. काही माध्यमांनी रेल्वे पोलीस दलालाही विनंती केली होती. त्याची दखल घेत रेल्वे पोलीस दलाने सोमवारी संध्याकाळी रांगेचा प्रयोग करून पाहिला. अंधेरी या पश्चिम रेल्वेवरील तुडुंब गर्दीच्या स्थानकावर संध्याकाळी महिलांना विरार लोकलमध्ये चढण्यासाठी रांग लावण्याची विनंती आरपीएफने केली आणि बायकांनी रेल्वेसाठी रांग लावत एक नवीन आदर्श घालून दिला. यासाठी आरपीएफने २० महिला कॉन्स्टेबल्सना गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी नेमलं होतं. विशेष म्हणजे, महिलांचा रांगेचा उत्साह पाहून पुरुष प्रवाशांनीही स्वतःहून रांग लावली.

अंधेरी व्यतिरिक्त बांद्रा, बोरीवली, मिरारोड आणि भाईंदर या स्थानकांवरही हा रांगेचा प्रयोग करण्याचा विचार सध्या आरपीएफ करत आहे. या प्रयोगासाठी ९७ रेल्वे कॉन्स्टेबल्सची नेमणूक करण्यात येणार आहे. या प्रयोगामुळे रेटारेटी कमी झाली तसंच बायकांच्या डब्यात सर्रास चालणारी गटबाजीलाही आळा बसेल, असं मत अनेक महिला प्रवाशांनी नोंदवलं आहे. पुरुषांच्या डब्यात बसण्याच्या जागेमुळे होणारी दादागिरी आणि हाणामारीही यामुळे थांबेल, असं पुरुष प्रवाशांचं म्हणणं आहे. मात्र, आम्ही रांग लावू पण, त्यासाठी लोकल वेळेवर येणं गरजेचं आहे. कारण, सगळ्यांची ऑफिसला जायची घाई असते. त्यामुळेच रेटारेटी करावी लागत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. तसंच रेल्वेच्या आगमनावेळी अचानक बदलले जाणारे फलाटही या रांगेच्या प्रयोगातला एक मोठा अडथळा असल्याचं मतही मुंबईकरांनी मांडलं आहे.