दिल जिंदा है… नव्या वर्षात नवी उमेद, स्वप्न, क्षितिजे

180

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईने गेल्या अनेक वर्षांत अनेक संकटे झेलली. कुठे इमारती कोसळल्या तर कुठे आगी लागल्या. वर्ष संपता संपता कमला मिल कंपाऊंडमधल्या आगीने मुंबई हादरवून टाकली. पण जणू काही मुंबईत जन्म घेणारा प्रत्येकजण आणि मुंबईला येऊन स्थिरावलेला अशा सर्वांना मुंबादेवी रोजच्या रोज नवी ऊर्मी देते, जगण्याची नवी उमेद देते. त्यामुळेच की काय नववर्षाची पूर्वसंध्याही मुंबईकरांनी गाजवली. दुसऱया दिवशीही मुंबईतील विविध ठिकाणी गर्दीचा उत्साह कायम होता. मंदिरेही गजबजून गेली होती.

गेटवे ऑफ इंडिया, राणीचा बाग, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटीपासून ते शिवाजी पार्क, मढ आयलंड सगळीकडेच पहिल्या दिवशीही मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त अनेक कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे चाकरमान्यांनीही कुटुंबकबिल्यासह नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचेही जोरदार स्वागत केले. इतकी संकटे येऊनही प्रत्येक वेळी नव्या उमेदीने आणि स्पिरीटने उभ्या राहणाऱया मुंबईकरांनी यावेळीही ‘दिल अभी जिंदा है…’ हेच दाखवून दिले.

बाप्पा मुंबापुरीला सुरक्षित ठेव
बाप्पा मुंबापुरीला सुरक्षित ठेव

हिंदुस्थानातील प्रमुख शहरांना थर्टी फर्स्टच्या दिवशी दहशतवादी संघटनांच्या हल्ल्याचा धोका होता. त्यामुळे मुंबईसह सगळीकडेच पोलिसांचा प्रचंड फौजफाटा होता. तरीही मुंबईकरांनी नववर्षाचे जोरदार स्वागत केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासूनच सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी ही ठिकाणे गजबजून गेली होती. कुणी बाप्पा मुंबापुरीला सुरक्षित ठेव अशी प्रार्थना देवाकडे करत होते तर कुणी यंदा आमच्या कुटुंबावर विघ्ने येऊ देऊ नको, अशा मागण्या करताना दिसत होते.

राणीबागही बहरली…

सुट्टी असल्याने बच्चे कंपनीने राणीच्या बागेत जाण्याचा हट्ट धरला. पहिल्या दिवशी इकडून तिकडे सूर मारणाऱया पेंग्विनसोबत मजामस्ती केली. जोडीला गेंडा, हत्ती, हरणांचा कळप, काळवीट अशा प्राण्यांची फौज होतीच. बच्चे कंपनीने राणीच्या बागेत मनसोक्त फेरफटका मारून पहिल्या दिवसाची सुट्टी मस्तपैकी एन्जॉय केली. दिवसभरात हजारो लोकांनी राणीच्या बागेला भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या