मुंबई भिडणार बडोद्याला, यजमानांचा वानखेडेवर आज ५००वा सामना

सामना प्रतिनिधी । मुंबई

सर्वाधिक ४१ वेळा रणजी चॅम्पियन झालेल्या मुंबईचा उद्यापासून वानखेडे स्टेडियमवर ५०० वा सामना सुरू होणार आहे. यावेळी या मोसमात तीन सामन्यांमधून एका निर्णायक विजयानिशी दहा गुणांची कमाई करणाऱया यजमान संघाला उद्या ‘क’ गटामध्ये बडोद्याचा सामना करावा लागेल. बडोदा संघाला यंदाच्या मोसमात आतापर्यंत सूर गवसलेला नाही. त्यांना तीन सामन्यांमधून फक्त चारच गुणांची कमाई करता आलीय.

या आकडेवारीवर एक नजर

मुंबईने १९६२-६३ सालामध्ये झालेल्या १०० व्या सामन्यात गुजरातला एक डाव ४० धावांनी हरवले.

१९७८-७९ साली गुजरातवर एक डाव व ४८ धावांनी विजय मिळवून मुंबईने २०० वा सामना संस्मरणीय केला.

१९९३-९४ साली फरीदाबाद येथे झालेल्या ३०० व्या सामन्यात मुंबईने हरयाणाला एक डाव व २०२ धावांनी धूळ चारली.

मुंबईने २००६-०७ सालामध्ये बंगालला १३२ धावांनी पराभूत करीत ४००व्या सामन्यात रणजी चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला.

स्पेशल लढत – आदित्य तरे

वानखेडे स्टेडियमवर उद्यापासून बडोद्याविरुद्ध खेळवण्यात येणारा रणजी क्रिकेट स्पर्धेतला सामना आमच्या संघातील सर्व खेळाडूंसाठीच स्पेशल असणार आहे. ५०० व्या सामन्यात आम्हाला मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करायला मिळत असल्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो, असे भावूक उद्गार मुंबई संघाचा कर्णधार आदित्य तरे याने लढतीच्या पूर्वसंध्येला काढले. दरम्यान, अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर या दोन्ही राष्ट्रीय खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱया लढतीत मुंबईचे पारडे जड असेल, असे यावेळी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.