मुंबई @ 500

द्वारकानाथ संझगिरी

मुंबईचा क्रिकेट संघ आज पाचशेवा रणजी ट्रॉफी सामना खेळतोय.

मला परवा एका क्रिकेट फॅनने विचारले, ‘त्याबद्दल काय वाटतं?’

मी म्हटलं, ‘काय वाटतं?’ मी देवाचे आभार मानतो की, त्याने मला मुंबईत जन्माला घातलं. मी बॅटच्या आधारानेच उभा राहायला लागलो. प्रत्येक श्वासाबरोबर, प्राणवायूबरोबर क्रिकेटही रक्तात गेलं. आजही मुंबई संघाचा विजय झाला की मनात आनंदाचं कारंजं उसळायला लागतं. मुंबई संघ हरला की मुलाला ठेच लागल्यावर आईचं हृदय विव्हळतं तसं हृदय विव्हळायला लागतं. पूर्वीप्रमाणे मुंबई संघाच्या मी जवळ नाही. कदाचित काही प्रकाशवर्षे दूर असेन. पण नातं घट्ट आहे. सूर्याची किरणं जशी सात-आठ मिनिटांत पृथ्वीवर येतात तसं हे अंतर क्षणात कमी होतं.’

माझी मुंबई क्रिकेटची कॉलर सदैव वर राहिली. यशात आणि पराभवातसुद्धा!

अलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट केवढं प्रचंड वाढलंय. त्याबरोबर टेलिव्हिजनचं कामही. इतर क्षेत्रही मला खुणावत असतात. क्रिकेट पट्टराणी असली म्हणून काय झालं? जनानखान्यातल्या फिल्म, संगीत, प्रवास वगैरे राण्यांकडेही लक्ष द्यावंच लागतं. त्यामुळं रणजी ट्रॉफीला जाणं होत नाही, पण एक कान मुंबईच्या स्कोअरकडे लागलेला असतो. मुंबईचं प्रेम अजिंक्य रहाणे-रोहित शर्माबद्दल लिहिताना, बोलताना उफाळून येतं. (खरं तर हे चुकीचं आहे. लेखकाने कुठल्याही प्रांताचं असू नये, पण आपला मुलगा खोडकर असतो. दुसऱयाचा तो मारकुटा)

पण मुंबई क्रिकेटच्या संदर्भात मी देवाचे आणखी एका गोष्टीसाठी आभार मानतो. त्याने योग्यवेळी जन्माला घातलं. त्यामुळे मी मुंबई क्रिकेटचा वैभवाचा काळ जवळून पाहिला. माझ्या क्रिकेटच्या देव्हाऱयातले माझे देव माझे मित्र झाले. माझ्या पौगांडवस्थेतला मुंबईचा संघ त्या दक्षिण आफ्रिकेतल्या ‘केप ऑफ गूड होप’च्या पत्थरासारखा अजिंक्य होता. मुंबईचे महान खेळाडू दौऱयावर असताना कोवळय़ा मुलांची मुंबईची ‘बी’ टीमही रणजी ट्रॉफी जिंकायची.  1973 साली कर्नाटक संघ या केप ऑफ गुड होपला वळसा घालणारा वास्को-द-गामा ठरला. त्यानंतर अधूनमधून जखमा झाल्या, पण त्या पटकन भरत गेल्या. साठच्या दशकात समोर सौराष्ट्र-गुजरात असताना टॉस जिंकून मुंबईने बॅटिंग घेतल्यावर गोलंदाज बिनधास्तपणे इरॉसला सिनेमाला जात. फलंदाजीबद्दल काय विश्वास असेल पाहा. खेळात पैसा नसतानाही निष्ठा अशी होती सुधाकर अधिकारीसारखा फलंदाज सकाळी नऊच्या मुहूर्तावर लग्न करायचा. साडेदहाला मुंबईसाठी आघाडीला जाऊन शतक ठोकायचा आणि संध्याकाळी स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला उभा राहायचा. फलंदाजीतली अफाट गुणवत्ता ही मुंबई क्रिकेटची परंपरा विजय मर्चंट, रुसी मोदींपासून जवळपास आजपर्यंत आहे. माझी तर अशी समजूत आहे की, स्वर्गातला फलंदाजीचा देव हा मुंबईकर मराठी असावा. जेव्हा जेव्हा त्याला हिंदुस्थानात महान फलंदाज जन्माला घालावासा वाटला तेव्हा तेव्हा त्याने त्याला मुंबईत जन्माला घातलं. तो मराठी असेल हे पाहिलं आणि पुण्यसंचय जास्त असेल तर आडनावात ‘कर’ राहील याची काळजी घेतली. उदा. विजय मांजरेकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर. त्यानंतर कुणी तरी इंद्राकडे त्या देवाबद्दल तो प्रांतीय आहे अशी फिर्याद करून त्याची बदली केली असावी. नाही तर विराट कोहली ‘कर’ आडनाव घेऊन मुंबईकरच झाला असता.

फलंदाजीतले बारकावे, खेळी उभारण्याचं ज्ञान, वेगवान गोलंदाजीविरुद्धची निर्भयता हे गुण मुंबईकर फलंदाजांमध्ये पिढीपिढीतून झिरपले. वेगवान गोलंदाजीपासून पळणारा मुंबईकर आणि मराठी असलाच तर अपवाद सिद्ध करण्यासाठी एखादाच. त्याला धाव घेताना एका हातातून दुसऱया हातात बॅट कशी न्यायची हे कुणी सांगायला लागत नाही. बॅट घासत क्रिझमध्ये न घुसण्याचं पाप राहुल द्रविडसारखा महान फलंदाजही करताना दिसेल, पण मुंबईकर सापडला तर तो अपवाद समजावा किंवा बाहेरून दत्तक ‘आलेला’ फलंदाज.

मुंबईने महान गोलंदाजही निर्माण केले. सुभाष गुप्ते, रमाकांत देसाई, पॅडी शिवलकर, झहीर खान वगैरे, पण परंपरा फलंदाजीचीच. मुंबईच्या क्रिकेटपटूला इतर प्रांतांतले खेळाडू ‘खडूस’ मानतात. ‘खडूसचा अर्थ बाजीप्रभू देशपांडेंसारख्या असाच घ्यावा. आज मुंबईची जुनी मक्तेदारी हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये नाही. क्रिकेटचा विस्तार खेडोपाडी, छोटय़ा शहरांत झाला. त्याचं एक कारण सचिन तेंडुलकर, त्याचं टीव्हीवरचं वास्तव्य, त्याची दादागिरी, त्याचं सद्वर्तन आणि त्याने हिंदुस्थानी जनतेला दिलेलं एक स्वप्नही आहे. त्यामुळे क्रिकेट प्रांतोप्रांती फुललं, पण तरीही स्वा. सावरकरांचे शब्द उसने घेऊन मी म्हणेन, ‘मुंबई क्रिकेट हे हिंदुस्थानी क्रिकेटचं खड़गहस्त आहे.’

जाता जाता माझं लाडके मुंबईकर रणजी खेळाडू. फलंदाजी अजित वाडेकर, गोलंदाजी – रमाकांत देसाई, क्षेत्ररक्षण – एकनाथ सोलकर आणि निखळ क्रिकेट गप्पांसाठी वासू परांजपे.