मुंबईकरांचे जलवाहतुकीचे स्वप्न ऑक्टोबरपासून पूर्ण होण्याची शक्यता

10

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकरांचे जलवाहतुकीचे स्वप्न ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. ही जलवाहतूक सुरू करण्यासाठी नियोजनानुसार कामे पूर्ण झाल्यास हे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. दक्षिण मुंबईतून उपनगरातील इतर ठिकाणांना जोडणारी जलवाहतूक सुरू झाल्यास रस्ते वाहतूक आणि रल्वेसेवेवरील ताण कमी होणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

मराराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, सिडको, एमबीपीटी आणि जेएनपीटीचा वाहतूक विभाग यांनी या वाहतुकीसाठी पाच स्पीड बोट विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका बोटीची किंमत सात कोटी आहे. या पाच बोटींसाठी 35 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या बोटी दक्षिण मुंबईहून मांडवा, ठाणे, ऐरोली, वाशी, नेरुळ, बेलापूर या ठिकाणी वाहतूक करणार आहेत. त्यामुळे प्रवासी दक्षिण मुंबईतून या ठिकाणी अर्ध्या तासात पोहचू शकणार आहेत. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. ही जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीची स्थिती, प्रवाशांची सुरक्षितता आणि इतर बाबींचा विचार करून जलप्रवासाचा मार्ग ठरवण्यात येणार आहे. काही ठिकाणी जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी जेट्टीची दुरुस्ती सुरू आहे. काही ठिकाणी तंरगती किंवा तात्पुरती जेट्टी उभारण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या जलवाहतूकीसाठी रस्ते मार्गाने प्रवासासाठी आकरण्यात येणाऱ्या दराएवढेच दर असतील असे सांगण्यात आले. या जलप्रवासामुळे मुंबई आणि उपनगरातील अंतर कमी होणार आहे. एका स्पीडबोटमध्ये सुमारे 20 प्रवासी बसण्याची क्षमता असेल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पूर्ण झाल्यास ऑक्टोबरपासून ही जलपाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या