मुंब्य्राच्या मॅटर्निटी रुग्णालयात आता २४ तास वीज

72

ठाणे, (प्रतिनिधी)

मुंब्रा येथे असलेल्या महापालिकेच्या मॅटर्निटी रुग्णालयात बत्ती गुल झाल्यावर मेणबत्तीच्या उजेडात करावे लागणारे प्रसूतीचे टेन्शन आता संपले आहे. शिवसेनेच्या प्रयत्नाने या रुग्णालयाला आता आधुनिक जनरेटर मिळाला असून ब्लॅकआऊट झाला तरी या रुग्णालयाला आता २४ तास वीज मिळणार आहे.

मुंब्रा येथील कोळीवाड्याजवळ महापालिकेचे हे मॅटर्निटी रुग्णालय आहे. शिवसेनेच्या नगरसेविका आणि आरोग्य समितीच्या अध्यक्ष पूजा वाघ यांनी चार महिन्यांपूर्वी या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली तेव्हा तेथे रुग्णालय कर्मचारी आणि रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. या रुग्णालयात मुदत संपून पडलेल्या औषधांचा साठा वाघ यांनी पाठपुरावा करून मार्गी लावला. तसेच ठिकठिकाणी दुरुस्त्या आणि पाणीगळतीचाही बंदोबस्त करण्यात आला.

या रुग्णालयात एक अत्यंत छोटासा इर्न्व्हटर आहे. मात्र जेमतेम दोन पंखे आणि ट्युबलाइट सुरू राहतील इतकीच त्याची क्षमता होती. त्यामुळे अनेक महिलांची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागत असल्याची धक्कादायक बाब पूजा वाघ यांच्या निदर्शनास आली. याची गंभीर दखल त्यांनी घेतली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघ यांनी पाठपुरावा सुरू केला. या रुग्णालयाला अद्ययावत जनरेटर मिळावा यासाठी त्यांनी महापालिकेतील उपनगर अभियंता सुनील पोटे यांना पत्र दिले. मुंब्रा येथील विद्युत विभागाचे प्रमुख सोनावणे यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याचे निवेदन दिले आणि महिलांना भोगाव्या लागणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी येथे तत्काळ जनरेटर बसवावा अशी मागणी केली.

अडचणींवर मात

हा जनरेटर कुठे बसवणार?, त्याचे फाऊंडेशन घालण्यायोग्य जागा आहे का? अशा अनेक अडचणी उभ्या ठाकल्या, परंतु वाघ यांनी अधिकार्‍यांच्या मदतीने त्यावर मात केली. त्यामुळे महापालिकेने किर्लोस्कर कंपनीचा २० किलो क्षमतेचा अद्ययावत जनरेटर या रुग्णालयासाठी मंजूर केला. त्याचे उद्घाटन आज आरोग्य सभापती पूजा वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सुधीर भगत, राजन किणी, विभागप्रमुख विजय चव्हाण व डॉ. गावडे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या