कारवाईमधील बेघरांना घरेच नाहीत!

सामना ऑनलाईन । धुळे

महापालिकेने स्टेशन रोडवर राबविलेली अतिक्रम निर्मुलन मोहीम बेकायदा होती. तेथील अनेक नागरिकांकडे राहण्यासाठी घरे नाहीत. कुणालाही मोहाडी उपनगरातील घरकुलांमध्ये जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील लोक बेघर झाले आहेत. महापालिकेने तातडीने स्टेशनरोडवरील नागरिकांची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपायुक्त शांताराम गोसावी यांना निवेदनद्वारे देण्यात आला.

धुळे महापालिकेने स्टेशनरोड परिसरातील चित्रकला महाविद्यालय ते दसेरा मैदानपर्यंतच्या भागातील अतिक्रमण काढली. गुरुवारी सकाळी सहापासून अतिक्रमण निर्मुलनास सुरुवात झाली. महापालिकेने अतिक्रमण निर्मुलनाची राबविलेली नियमबाह्य असल्याचा आरोप प्रशासनावर केला आहे. अतिक्रमण काढण्यात आलेल्या नागरिकांना कुठेही घरे देण्यात आलेली नाहीत. मोहाडी उपनगरातील सर्वच घरकुलांमध्ये लोक राहत आहेत. त्यामुळे स्टेशनरोडवरील नागरिकांना ती घरकुले मिळू शकत नाहीत.

सकाळी पाच वाजेपासून अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई सुरू झाल्याने नागरिक भांभावले होते. त्यांना घरातील सामानही बाहेर काढता आला नाही. यात संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने या नागरिकांच्या रहिवासाची सोय करावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन देतांना भारिप बहुजन महासंघाचे भैय्या पारेराव, मिलिंद वाघ, योगेश जगताप, निलेश अहिरे, गौतम बोरसे, योगेश बेडसे, आकाश बागुल, भोला अहिरे, इंद्रजित कर्डक, सनी जाधव, सागर मोहिते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.