पाथर्डीतील पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

1

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुणाल पाटील यांना सत्ताधारी भाजप आघाडीचे नगरसेवक प्रवीण किशोर राजगुरू यांनी दमदाटी केल्याच्या निषेधार्थ पालिकेतील कर्मचाऱ्यांनी शनिवारी चार तास काम बंद आंदोलन करत राजगुरू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कुणाल पाटील यांच्याकडे पालिकेतील आरोग्य, अग्निशमन व पाणीपुरवठा विभागाची जबादारी आहे. दोन दिवसांपूर्वी प्रवीण राजगुरू यांनी कुणाल पाटील यांना आरोग्य विभागाच्या ठेकेदाराशी केलेल्या करारनाम्याच्या प्रतीची मागणी केली होती. पाटील यांनी राजगुरू यांना लेखी पत्र देण्यास सांगितले. त्यावर राजगुरू यांचा पारा चढला आणि त्यांनी कुणाल पाटील यांना खडसावले.

या प्रकरणाची पालिकेत चर्चा झाली होती. पाटील यांनी घडलेला सर्व प्रकार शनिवारी कर्मचाऱ्यांना सांगत पालिकेच्या अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र दिले. या प्रकारची गंभीर दखल घेऊन आपल्याला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर पालिकेचे सर्व कर्मचारी एकत्र आले. त्यांनी राजगुरू यांच्या निषेधाच्या घोषणा देत काम बंद आंदोलन सुरु केले. पालिकेचे मुख्याधिकरी धनंजय कोळेकर कार्यालयात उपस्थीत नसल्याने कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे याना निवेदन देऊन आंदोलन स्थगित केले. दरम्यान पालिकेतील सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक व पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या पूर्वीही शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळीही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलने केले होते.