नागपुरात स्थानिक भाजप नेत्याचा मुलांसह राडा

सामना ऑनलाईन । नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीक असलेला नागपूर भाजपचा नेता मुन्ना यादव व त्याच्या दोन्ही मुलांची गुंडागर्दी थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी नागपूर शहरातील अजनी भागात मुन्नाच्या दोन्ही मुलांनी गुंडागर्दी करत चांगलाच राडा केला व सामान्यांना वेठीस धरले. पापा यादव यांची बहीण भाऊबीजेनिमित्त घरी आली असता पूर्व वैमनस्यातून मुन्ना यादव याची पत्नी लक्ष्मी यादव व मुलगा करण व अर्जुन यांनी बाला यादव च्या घरावर हल्ला चढवला.

त्यांच्या घरातील महिलांना मारहाण केली व प्रतिकारासाठी धावलेल्या बाला यादव व मंगल यादव यांना देखील जबर मारहाण करण्यात आली. घटनेच्या वेळी दोन्ही गटातील गुंडांनी राडा करत तोडफोड केली. पापा यादव याच्या फिर्यादीवरून भाजप नेता मुन्ना यादव व त्याच्या करण व अर्जुन या दोन्ही मुलांवर तसेच पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव यांच्यावर हत्येच्या प्रयत्न करणे, जमावाला भडकावून मारहाण करण्याचा गुन्हा धंतोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आता मुन्ना यादवला पोलीस कधी अटक करतात याकडे तमाम नागपुरकरांचे लक्ष लागले आहे.