मुन्ना यादव प्रकरण गुन्हे शाखेला सुपूर्द

सामना प्रतिनिधी । नागपूर

मुन्ना यादव प्रकरण गुन्हे शाखेला सुपूर्द करण्यात आले आहे, अशी माहिती बुधवारी सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी नागपूर खंडपीठाला दिली.  न्या. रवि देशपांडे यांनी अ‍ॅड. रजनीश व्यास यांना याप्रकरणी आपले म्हणणे मांडण्यासाठी एक आठवडयांचा अवधी दिला आहे. अवधेश उर्फ पापा यादव यांच्या पत्नी नविता यादव यांनी हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. त्यांनी सीबीआय किंवा सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी ८ डिसेंबर रोजी न्या. देशपांडे यांनी गृह सचिव, पोलीस आयुक्त आणि धंतोली पोलिस ठाणे यांना नोटीस बजावली होती.

दरम्यान, २१ आॅक्टोबरला  फियार्दी अवधेश उर्फ पापा नंदलाल यादव (३४) यांची बहीण मंजू यादव भाऊबीजेनिमित्त घरी आली असता पूर्व वैमनस्यातून मुन्ना यादव यांची पत्नी लक्ष्मी यादव आणि मुले करण व अर्जुन यांनी बाला यादवच्या घरावर हल्ला केला. त्यांच्या घरातील महिलांना मारहाण केली. प्रतिकारासाठी धावलेल्या बाला यादव आणि मंगल यादव यांना देखील मारहाण केली. याप्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात मुन्ना यावद व इतर लोकांविरूध्द तक्रार देण्यात आली. पोलिसांनी मुन्ना यादव व इतरांविरूध्द गुन्हे दाखल केले आहे.  परंतु तपास थांबला आहे. पोलिस आयुक्तांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे याप्रकरणाची सीबीआय वा सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नविता यादव यांच्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.