चुलतभावानेच दिली सुपारी, तिघे अटकेत

गायकवाड खून प्रकरणाला कलाटणी
लोणी काळभोर– वडकी येथे झालेल्या शिवाजी गायकवाड यांच्या खून प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. गायकवाड यांच्या चुलतभावानेच या खुनाची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ‘महाराष्ट्र केसरी’ दत्ता गायकवाड याच्यासह आठजणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आज आणखी तिघांना अटक करण्यात आली. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. खुनाचा मुख्य सूत्रधार पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड फरार आहे.
शिवाजी दामोदर गायकवाड (वय ५०, रा. वडकी, तळेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी यांचा मुलगा अजिंक्य याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेघराज विलास वाहळे (वय २३, रा. भुकूम, खाटपेवाडी, ता. मुळशी), शंकर विजय भिलारे (वय २४, रा. कर्वेनगर साईबाबा मंदिरासमोर, पुणे, मूळ रा. वरवडे, ता. आंबेगाव) दत्तात्रय महादेव पाडाळे (वय २३, रा. म्हाळुंगे, ता. हवेली) या तिघांना आज अटक करण्यात आली आहे. तर लखन ऊर्फ लक्ष्मण मोडक, सचिन फाटे, ‘महाराष्ट्र केसरी’ दत्ता भानुदास गायकवाड, संतोष मोडक, सोमनाथ गायकवाड, दीपक मोडक, पंडित मोडक आणि विवेक पंडित मोडक या आठजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पंडित मोडक व विवेक मोडक फरारी असून, सहाजण न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.
खून झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्याकडे गुन्ह्याचा समांतर तपास होता. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड या पथकाची नेमणूक केली होती. पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यांना खरे खुनी दुसरेच असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी २५ डिसेंबरला मेघराज वाहळे याला पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. शिवाजी गायकवाड यांचा पुतण्या पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याने खुनाची सुपारी दिली असल्याचे सांगीतले.
शिवाजी यांचा खून केल्यावर माझा भाऊ अनिल गायकवाड, उत्तम गायकवाड यांच्यासह १३ जणांविरोधात दाखल असलेल्या खुनाच्या केसमधून त्यांना जेलमधून सुटण्यास मदत करू आणि ठरावीक रक्कम देण्याचे पप्पू गायकवाड याने कबूल केले होते. यामुळे त्याच्या सांगण्यावरून शिवाजी गायकवाड यांचा खून केल्याचे सांगीतले. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी करत आहेत.