रत्नागिरी विशेष कारागृहातील कैदी पळाला, सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

16

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी विशेष कारागृहातील कैदी पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला हा कैदी विशेष कारागृहातील अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळाल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रत्नागिरी विशेष कारागृहातील कैदी क्र. 10 रुपेश तुकाराम कुंभार हा खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रत्नागिरी विशेष कारागृहाच्या बगिच्यामध्ये काम करणारा रुपेश हा कारागृहाच्या आवारातील शेतामध्ये काम करत होता. काम करत असताना तो शेतीलगत असणाऱ्या शौचालयामध्ये गेला आणि तिथून त्याने पोबारा केला. कैदी पळून गेल्याचे कळताच रत्नागिरी विेशेष कारागृहातील सुरक्षा रक्षकांची फेफे उडाली. त्यांनी धावाधाव सुरू केली. पण तोपर्यंत रुपेश हा सर्वांच्या हातावर तुरी देऊन निसटला होता. कैदी पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणामुळे रत्नागिरी विशेष कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तसेच कैद्यांवर नजर ठेवणारे रत्नागिरी विेशेष कारागृहाचे पोलीस त्यावेळी नक्की काय करत होते असा सवालही आता उपस्थित झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या