खंडणीसाठी शेजारच्या मुलाचा खून करून जमिनीत पुरला

1

सामना प्रतिनिधी । पुणे

खंडणीसाठी शेजारी राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलाचा खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा समोर आली. निखिल अनंत अंगरोळकर (वय 16) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत (वय 22) या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनयसिंग आणि अंगरोळकर हे शेजारी आहेत. रविवारी निखील घरातून बाहेर गेल्यानंतर तो परत घरी आला नाही, त्यामुळे सोमवारी त्याच्या घरच्यांनी वारजे पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दोन दिवस पोलिसांनी तपास केला, त्यावेळी राजपूत याच्यासोबत तो फिरताना काही जणांनी पाहिले होते. वारजे पोलिसांनी राजपूतला ताब्यात घेऊन चौकशी केली. तो मुलगा हा नेहमीप्रमाणे घरी परत न आल्याने अनंत अंगरोळकर यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निखिल हा बिनयसिंग राजपूत याच्यासोबत दिसल्याचे समजले. तसेच राजपूत आपल्याला जबरदस्तीने बाहेर कुठे घेऊन जात असल्याचे निखिलने त्याच्या वडिलांना फोनवरून सांगितले होते. पोलिसांनी राजपूतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबुल केले.

वारजे ते डुक्कर खिंड दरम्यान आदित्य गार्डनच्या मागे डोंगराळ भागात राडारोड्याच्या खाली त्याचा मृतदेह पुरल्याचे देखील त्याने सांगितले. गुरुवारी दुपारी हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्यानंतर लोकांना पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.