लातूरमध्ये काठ्या, कुर्‍हाडीने मारहाण करून एकाची निर्घृण हत्या

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूरमध्ये काठी आणि कुर्‍हाडीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अंकुश निवृत्ती आवले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निलंगा पोलीस ठाण्यात बालाजी रामराव वरवटे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राम अंकुश आवले यांनी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

निलंगा ते अनसरवाडा रस्त्यावरील बलिक खुर्शिद मिया देशमुख यांच्या शेतात 13 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता बालाजी रामराव वरवडे राहणार पेठ याने अंकुश निवृत्ती आवले (वय 55) यांना काठी आणि कुर्‍हाडीने बेदम मारहाण केली होती. हातावर, पायावर, पोटावर , पाठीवर , छातीवर, कपाळावर मारहाण झाली असल्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत अंकुश आवले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. निलंगा पोलीस ठाण्यात याप्रकरणी बालाजी रामराव वरवटे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल चोरमले हे करीत आहेत.