बायकोला वाईट बोलतो म्हणून मित्राचा केला खून


सामना ऑनलाईन । मालवण

मालवण पोलिसांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणाची एका दिवसात उकल केली आहे. बायकोला वाईट बोलतो म्हणून एकाने आपल्या मित्राची हत्या केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

धारवली गाव येथील खाडीमध्ये २४ सप्टेंबरला ३५ ते ४० वर्ष वयाच्या एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती नागरिकांनी मालवण पोलिसांना दिली होती. मालवण पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी इतर पोलीस स्थानकास संपर्क साधला. त्यानंतर हत्या झालेला माणसाचे नाव रईस करीमुल्ला अन्सारी (३८) असल्याचे स्पष्ट झाले. तो गणेश नगर, कांदिवली पश्चिम येथील रहिवासी होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला.

अन्सारी यांची हत्या का आणि कोणी केली? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा होता. मात्र खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अन्सारी राहात असलेल्या इस्लाम कंपाउंड, गणेशनगर कांदिवली पश्चिम येथून त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. पोलिसांच्या सखोल चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अन्सारी याने आपल्या बायकोला वारंवार वाईट शब्द वापरल्याने रागातून त्याची हत्या केल्याचे सांगितले. अप्पर पोलीस आयुक्त राजेश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.