भावावरच्या रागातून काकाने पुतण्याला केले ठार

मुंबई प्रतिनिधी

वडाळा खाडी परिसरात शुक्रवारी सापडलेल्या पाच वर्षांच्या तौसिफच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा काका वसीरउल्ला शेख (२३) याला अटक केली. वसीरउल्ला याचे भाऊ नौशाद याच्याशी वाद होता. भावावरच्या रागातून काकाने पुतण्याचा जीव घेतल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.

वडाळ्य़ाच्या शांतीनगर परिसरात कुटूंबियांसोबत राहणारा तौसिफ शुक्रवारी घराबाहेर खेळता खेळता गायब झाला. शोधाशोध करूनही तो सापडला नसल्याने नौशाद यांनी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तौसिफचा शोध सुरू केला त्यावेळी खाडीजवळील झुडपात त्याचा मृतदेह सापडला. तौसिफची हत्या झाल्याचे उघड झाल्याने वडाळा टीटी पोलीस आणि क्राइम ब्रँच युनिट-४ च्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असतानाच तौसिफ याच्या कुटुंबीयांवरही वॉच ठेवला. चौकशीमध्ये तौसिफचे वडील नौशाद आणि काका वसीरउल्ला यांच्या व्यवसाय आणि पैशावरून वाद असल्याचे पुढे आले. यावरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडणे होत असल्याचे समजल्यावर युनिट-४ च्या अधिकाऱ्यांनी वसीरउल्ला याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडावाउडवीची उत्तरे देणाऱ्या वसीरउल्ला याने पोलिसांनी खाक्या दाखवताच हत्या केल्याचे कबूल केले. भावाला धडा शिकविण्यासाठी तौसिफला मारल्याचे त्याने सांगितले.