​गळ्याला आवळलेल्या दोरीवरून झाला खुनाचा उलगडा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

खून झालेल्या व्यक्तीच्या गळ्याला आवळलेल्या दोरीवरून कामशेत पोलिसांनी खुनाचा छडा लावला आणि दोनजणांना गजाआडही केले. विठ्ठल रघुनाथ वाल्हेकर (वय २७) व रघुनाथ चंदू वाल्हेकर (वय ५५) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत, तर तिसरा आरोपी कैलास उर्फ काळू रघुनाथ वाल्हेकर हा पसार आहे. हरिश्चंद्र पांडुरंग वाघमारे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मळवली ते कामशेतदरम्यान लोहमार्गावर १० डिसेंबर रोजी एक मृतदेह रेल्वे पोलिसांना आढळला. पंचनामा केल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. मात्र कोणताच पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता. फक्त मृत हरिश्चंद्र यांच्या गळ्यापाशी मिळालेल्या लहान दोरीच्या साहाय्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. ही दोरी खताच्या पोत्यापासून बनवलेली असल्याचे समोर आले. अशा प्रकारची दोरी वळण्याचे काम कातकरी समाज करतो. यावरून पोलिसांनी पवन मावळ व परिसरातील कातकरी वस्त्यांमध्ये तपास करण्यास सुरुवात केली. यामध्ये या समाजातील कोणती कुटुंबे त्यांचा रहिवास सोडून इतरत्र गेली आहेत याचा शोध सुरू झाला. त्यानुसार पोलिसांना विठ्ठल वाल्हेकर याच्याविषयी माहिती मिळाली. त्याला डोंगरवाडी येथे पकडले, तर दुसरा आरोपी रघुनाथ वाल्हेकर याला विसापूर किल्ल्यालगत धालेवाडी येथे जेरबंद केले.

चौकशीत त्या दोघांनी खुनाची कबुली दिली. मृत हरिश्चंद्र वाघमारे हे कामशेत येथील पोल्ट्री फार्मच्या बांधकामावर रखवालदार म्हणून कामाला होते, तर आरोपी रघुनाथ, विठ्ठल व कैलास हे जवळील एका शेतावर कामाला येत होते. ते डोंगरवाडी-बोरजच्या खिंडीतून डोंगर चढून रोज पायी येत जात होते. ते पोल्ट्रीजवळून रोज येत-जात असल्याने हरिश्चंद्र वाघमारे यांनी त्यांना रोखले. यातून त्यांची वादावादी झाली. याचा राग मनात धरून तिन्ही आरोपींनी हरिश्चंद्र यांचा शेतात कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वळलेल्या दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वेरूळावर आणून टाकला. याप्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील करीत आहेत.