लातुरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून, मृतदेह फेकला खड्ड्यात


सामना प्रतिनिधी । लातूर 

शहरातील बार्शी मार्गावरील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर एका खड्यात मृतदेह आढळून आला. सदरील मृतदेह रिक्षाचालक युवकाचा होता. अत्यंत निर्घृणपणे खून करून मृतदेह फेकून देण्यात आलेला होता. शिवम उमाकांत मेंगले असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.

शिवम  मेंगले (वय २१) हा मुळचा चिंचोली  बल्लाळनाथ येथील रहिवासी होता.  शहरातील कपिल नगरात तो आपल्या कुटुंबासह राहत होता. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रोजच्याप्रमाणे अ‍ॅटोरिक्षा घेऊन तो घराबाहेर गेला. मात्र, सकाळी घरी परतलाच नसल्याने त्याचा शोधाशोध सुरू झाला. तेव्हा बिडवे महाविद्यालयासमोरील रोडलगतच्या चरीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे तोंड दगडाने ठेचलेल्या अवस्थेत होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

घटनास्थळापासून थोड्या अंतरावरच त्याची रिक्षा रस्त्यावर उभी होता. खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा शोध घेण्याचे कठीण आव्हान पोलिसांसमोर आहे. मारेकऱ्यांना शोधल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला होता.