निवडणुकीच्या वादातून मागास समाजाच्या तरुणाची हत्या, राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप


सामना प्रतिनिधी । सांगली

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून मागासवर्गीय समाजातील एका युवकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर युवकाचा उपचार दरम्यान सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तासगाव तालुक्यातील वायफळेमध्ये ही घटना घडली असून युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांवर मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.

२०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तासगावच्या वायफळेमध्ये राजेश फाळके या मागासवर्गीय समाजातील व्यक्तीचा खून झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मागासवर्गीय समाजातील मते पडली नाहीत. या कारणावरून राजेश पाटील आणि राजेश फाळके यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. वादावादीचे पर्यवसन हाणामारीत झाले असा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, याप्रकरणी युवक राष्ट्रवादी काँग्रेस तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ मातंग व इतर संघटनांकडून वायफळे आणि तासगाव बंद पुकारण्यात आला आहे.