कुरुळा येथे तरुणीचा खून, पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

सामना प्रतिनिधी, कंधार

तालुक्यातील कुरुळा येथील १९ वर्षीय युवती अनिता ग्यानोबा हुरसुळे हिचा मृतदेह गावाजवळील खदाणीजवळ सापडला. तिच्या मृतदेहाची अवस्था पाहता तिचा खून झाला असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. मात्र, पोलिसांनी याबाबत बघ्याची भूमिका घेतल्याने नातेवाईक व गावकरी चांगलेच संतप्त झाले. नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

अनिता ग्यानोबा हुरसुळे ही आपल्या दोन मैत्रिणींसोबत गुरुवारी कामानिमित्त बाहेर पडली. तिच्या दोन्ही मैत्रिणी थोड्याच वेळात परतल्या पण ती मात्र परतली नाही. याबाबत तिच्या नातेवाईकांनी कंधार पोलीस ठाण्यात तक्रारही दिली, मात्र पोलिसांनी याकडे कानाडोळा केला. काल रात्री उशिरा कुरुळा येथील खदाणीजवळ तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला. यावरून खुनाचा संशय बळावला असून, कंधार येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करूनही नातेवाईकाच्या मृतदेह न घेण्याच्या निर्धारामुळे सदर मृतदेह पुनश्च शवविच्छेदन करण्यासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मयत तरुणीचे भाऊ तुकाराम व वैजनाथ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिता ही गुरुवारी बाहेर जाते म्हणून तिच्या दोन मैत्रिणींसोबत निघाली. तिच्या मैत्रिणी परतल्या पण ती मात्र आली नसल्याने शुक्रवारी कंधार पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर शनिवारी सदर मुलीचा मृतदेह मयत अवस्थेत गावाजवळील खदाणीत सापडला. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शवविच्छेदन केले. यानंतर नातेवाईकांनी संशयित आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा घेतला. याचबरोबर झालेले शवविच्छेदन चुकीचे करण्यात आले आहे, असा आरोपही नातेवाईंकानी केला आहे.

पोलिसांनी अज्ञात आरोपीमविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अनिताच्या मैत्रिणींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भारती, पोलीस चाटे, जाधव हे करीत आहेत.