परळीत धारदार शस्त्राने वार करत खून; आर्थिक व्यवहारातून घटना घडल्याची शक्यता

एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना परळीत घडली आहे. या घटनेने परिसरात एक खळबळ उडाली आहे.खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात रविवारी आढळून आला. महादेव दत्तू मुंडे ( वय 40, रा.भोपळा, ह.मु.परळी वैजनाथ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून सध्या ते परळीतील अंबेजोगाई रस्तावरील परिसरात राहात होते. परळी शहर पोलिसांना ही घटना समजताच पोलीस निरीक्षक रवी सानप,पोलीस जमादार भास्कर केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांनी परळीत येऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.मुंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

याबाबत परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी सानप यांनी हा खूनाचा प्रकार आहे गळ्यावर व गालावर शस्त्राने वार केल्याने जखमचे वण आहेत.आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.पोलीस तपासात कारण पुढे येईल माहिती त्यांनी दिली.