आमचा अपमान करून पक्षातून हाकलले, वाचा मुरली मनोहर जोशींच्या व्हायरल पत्राचे सत्य

6

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हे पत्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना लिहिण्यात आले आहे. या पत्रामध्ये मुरली मनोहर जोशी यांनी पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. तसेच घरातील (पक्षातील) लोकांनी आमचा (अडवाणी आणि जोशी) अपमान करून घराबाहेर (पक्षातून) हाकलून लावले आहे, असा आरोप जोशींनी केला आहे.

murali-manohar-joshi

लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना तिकीट देण्यात आलेले नाही. अशात जोशी यांनी केलेल्या आरोपींचा पत्र समोर आल्याने ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. परंतु ‘मुरली मनोहर जोशी यांनी अडवाणी यांना लिहिलेले पत्र’ अशा नावाने व्हायरल होणाऱ्या पत्राचे फोटो खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. असे कोणतेही पत्र मुरली मनोहर जोशी यांनी अडवाणी यांना लिहिलेले नाही. जोशी यांच्या कार्यालयातून हे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

व्हायरल होणाऱ्या पत्रावर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेचे नावही असल्याने लोकांना हे अधिकृत पत्र असावे असे वाटले. परंतु आपल्या नावाने चुकीचे पत्र व्हायरल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर एएनआयने याचा खुलासा करत हे खोटे पत्र असल्याचे सांगितले आहे. परंतु हे पत्र कोणी आणि का व्हायरल केले याचा खुलासा झालेला नाही. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही वृत्त नाही.