आयडॉलचे अॅडमिशन, परीक्षा, निकाल ‘युवा’ अॅलर्टवर

42

विद्यार्थ्यांचे खेटे थांबणार
आजपासून मोबाईलवर येणार सर्व मेसेज

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अॅडमिशन, परीक्षा आणि निकालासह सर्व प्रकारची माहिती ‘युवा’ अॅपवरील अॅलर्टमधून मिळणार आहे. उद्यापासून हे अॅप सुरू होत असून तब्बल सव्वा लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे चौकशीसाठी होणारे खेटेही थांबणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) नोकरी करणारे आणि शिक्षणाची इच्छा अपूर्ण राहिलेले लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी ‘आयडॉल’ची वेबसाइट पाहावी लागते. अनेक वेळा पुढे ढकलण्यात येणाऱ्या परीक्षा, परीक्षा अर्ज भरण्यासाठी वाढवलेली मुदत, जाहीर झालेल्या निकालांची माहिती मिळवण्यासाठी कालिना कॅम्पसमध्ये खेटे मारावे लागतात, मात्र आता ‘युवा’ अॅपमुळे विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

गुगलवरून करा डाऊनलोड
विद्यार्थ्यांना गुगलवरून किंवा प्ले स्टोअरमधून आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘युवा’ (Yoovva IDOL) डाऊनलोड करावे लागेल. १४ मार्चपासून ही सेवा कार्यान्वित होईल. यामध्ये प्रवेश, निकाल, परीक्षा, अध्ययन साहित्य, विविध घडामोडी, बातम्या या अॅपवर पाठवल्या जातील. ‘आयडॉल’मध्ये विविध प्रकारच्या ३४ कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या ७७ हजार ५०० विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थींना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

‘आयडॉल’मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी हे नोकरी करणारे असतात. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘युवा’ ऍप सुरू करण्यात आले आहे. या अॅपवरून विद्यार्थ्यांना दिवसातून किमान दोन वेळा अॅलर्ट देण्यात येईल.
-विनोद माळाळे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ

आपली प्रतिक्रिया द्या