इस्लामिक राज्याच्या स्थापनेसाठी मूसा बांधतोय नवीन जिहादी संघटना

3

सामना ऑनलाईन, दिल्ली

हिजबुल मुजाहिदीनचा माजी संघटक जाकिर मूसा याने कश्मीरमध्ये इस्लामिक राज्याच्या स्थापनेसाठी नवीन जिहादी संघटनेची बांधणी करायला सुरूवात केली आहे. या नव्या संघटनेत भरती होण्यासाठी शेकडो कश्मीरी तरूण इच्छुक असले तरी निवडीचे निकष अत्यंत कठोर आहेत. मूसा याने नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात पूर्वेकडील देशांमध्ये इस्लामिक राज्याची स्थापना आणि कश्मीरात शरियत कायदा लागू करण्यासाठी जिहादचा नारा दिला आहे. ‘घाजवट-उल-हिंद’ असे या नव्या संघटनेचे नाव आहे.

अतिरेकी संघटना अल-कायदाचा प्रभाव असलेल्या ‘घाजवट-उल-हिंद’ने ‘फाउंडेशन ऑफ न्यू मूवमेंट ऑफ जिहाद इन कश्मीर’ या नावाने फतवा जारी केला आहे. त्यात ‘अल्लाह की मेहरबानी और मुस्लिम मुल्कों की मदद से’ कश्मीर स्वतंत्र करण्यात येईल. शहीद बुरहाण वानी याच्या हौतात्म्यानंतर कश्मीरात तरूणांमध्ये जोश निर्माण झाला असल्याचे त्यात म्हटले आहे. अल्लाह आणि मुहम्मद पैगंबरांचे नाव घेऊन पाठवलेल्या या संदेशात कश्मीर स्वतंत्र करण्यासाठी जिहादचा एक नवा अध्याय सुरू झाला असून जाकिर मूसा याच्या नेतृत्वाखाली शहीद झालेला बुरहाण हा पहिला हुतात्मा ठरविण्यात आला आहे.

हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी मात्र जाकिर मूसा याच्या ‘घाजवट-उल-हिंद’ची निर्भत्सना केली आहे. हिजबुल मुजाहिदीनचे नवे कमांडर सैयद सलाहुद्दीन याने ‘घाजवट-उल-हिंद’ ही हिंदुस्थान सरकारचीच एक चाल असून कश्मीरातील स्वातंत्र्य चळवळीत फुट पाडण्यासाठी व हि चळवळ बदनाम करण्यासाठी जाकिर मूसा याला हाताशी धरून हिंदुस्थान सरकारच ‘घाजवट-उल-हिंद’चा पाठिराखा आहे. सिरिया, तुर्कस्थान, इराक आणि अफगाणात आयसीसने जे केले तसेच कश्मीरात रक्ताचे पाट वाहण्याचा व कश्मीरी जनतेच्या मनातून अतिरेक्यांच्याविषयी नफरत निर्माण करण्याचा हिंदुस्थान सरकारचा डाव असल्याचे ‘लष्कर ए तोयबा’चेही मत आहे.