मुसळवाडी तलाव भरले, ९ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला


सामना ऑनलाईन ।  राहुरी  

मुळा डावा कालव्याच्या आवर्तनातुन मुसळवाडी तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने ९ गावांचा पाण्याचा प्रश्न ५ महिन्यांसाठी मिटला आहे.  मात्र डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील मानोरी, वळण, मांजरी या भागातील शेती पिकांचे भरणे अर्धवट असताना कालवा बंद केल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. पावसाळ्यातील तीन महिने कोरडे गेल्याने  मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील जळुन चाललेल्या शेत पिकांसाठी पाण्याचे  आवर्तन सोडण्याची मागणी राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली होती. या मागणी वरून २ ऑगस्टला मुळा डावा कालव्यातुन २५० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी ६५० दशलक्ष घनफुट पाण्याचे आरक्षण आहे. मात्र मुळा डावा कालव्यातुन सव्वा महिन्याच्या रोटेशन मध्ये ५२५  दशलक्ष घनफुट पाणी दिल्याने टेलचा शेतकर्‍यांचे पिकांचे भरणे अर्धवट राहिले आहे.

डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील टेलच्या शेतकर्‍यांची शेती पिकांचे भरणे अर्धवट असतानाच शनिवारी दुपारी अचानक आवर्तन बंद करण्यात आले आहे. मुसळवाडी तलाव पाण्याने भरल्यानंतर डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीचे रोटेशन ६५० दशलक्ष घनफुट पाणी खर्च होईपर्यंत सुरू ठेवणे  गरजेचे होते हा हतबलतेचा सूर शेतकर्‍यात उमटत आहे. दुपारी मुळा उजव्या कालव्यातुन २५० क्युसेकने पाण्याची वाढ करण्यात आली आहे. उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी  १४५३ क्युसेकने पाणी आवर्तन सुरू आहे.

२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात मुळा धरणातुन ४ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी देण्यात आले आहे. १५ सप्टेंबर पुर्वी उजव्या कालव्याच्या आवर्तनाचा शेवट  होण्याची शक्यता आहे. आज रविवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणात अवघी ६३५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.  सायंकाळी पाणीसाठा २० हजार ३० दशलक्ष घनफुट झाल्याने धरण ७७ टक्के भरले आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणातील पाणीसाठ्याची २२ हजार ९४० दशलक्ष  घनफुट नोंद होऊन मुळा धरण ९० टक्के  भरले होते.

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी तलावावर लाख, जातप, माहेगाव, खुडरसगाव, त्रिंबकपुर, टाकळीमिया, पाथरे, शेणवडगाव या ९ गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. १८९ दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेला मुसळवाडी तलाव शनिवारी पुर्ण क्षमतेने भरल्याने योजनेच्या लाभक्षेत्रातील पिण्याचा पाणीप्रश्न मिटला आहे.