संगीत शंकर दरबारमध्ये यावर्षी बेगम परवीन सुलताना, मुकुल शिवपूत्र व छोट्या सूरवीरांची  हजेरी

18


सामन प्रतिनिधी । नांदेड

हिंदुस्थानचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने होत असलेल्या संगीत शंकर दरबार ही संगीत मेजवाणी यावर्षी २५ ते २७ फेब्रुवारी या तीन दिवसात रसिकांना मिळणार आहे.

या महोत्सवात बेगम परवीन सुलताना, मुकुल शिवपूत्र, उस्ताद शाहीद परवेझ व यावर्षीची राजगायिका स्वराली जाधव हिच्यासह छोटे सूरवीर रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कलर्स मराठी वाहिनीच्या सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातील सर्वच स्पर्धक आपली कला सादर करणार आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी निवेदन करणार आहेत.

२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत कु.भार्गवी देशमुख हिचे नृत्य होणार असून, स्वराली जोशी व साईप्रसाद पांचाळ यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता एस.आकाश (बासरी), यज्ञेश रायकर (व्हायोलिन) व ईशान घोष (तबला) यांच्या जुगलबंदीचा त्रिभक्ती हा कार्यक्रम होणार आहे. दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मराठी दिनानिमित्त मराठी पहाट हा कार्यक्रम होईल. यात धनंजय जोशी, सौ.मुग्धा भट यांची नाट्यगिते होतील. या कार्यक्रमाचे निवेदन आकाशवाणीचे निवेदक लक्ष्मीकांत धोंड हे करणार आहेत. दुपारी ११ ते १ या सत्रात अभिनय रवंदे यांचा हार्मोनियम सोलो हा कार्यक्रम होईल. तसेच सौ.चंदर आडगावकर यांचे शास्त्रीय गायन होईल.

साहित्य आणि संगीत या क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या ज्येष्ठ कलावंतांना संगीत शंकर दरबार जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी साहित्य क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांना तर संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार महामहोपाध्याय पं.कमलाकर परळीकर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कार समारंभास पं.नाथराव नेरलकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या