‘डोंबिवली रिटर्न’चा म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

1

सामना ऑनलाईन । मुंबई

सर्वसामान्य मुंबईकराच्या जगण्याचा वेध घेणाऱया ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटाच्या ट्रेलरला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केवळ चार दिवसांतच ट्रेलरला सोशल मीडियात मिळालेल्या व्ह्यूजची संख्या 20 लाखांहून अधिक झाली आहे. लोकलचे खडखडणारे रूळ… मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी… त्याबरोबरीनं येणारे प्रश्न… आणि मनातला कोलाहल… ‘डोंबिवली रिटर्न’ जे जातं…तेच परत येतं? या चित्रपटाच्या ट्रेलर मधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार आणि पर्क्यूसिस्टिस्ट तौफिक कुरेशी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत, जी कथानकाला साजेशी असून वेगवेगळ्या पठडीतील आहेत. चंद्रशेखर सानेकर, मुकुंद सोनावणे यांनी लिहिलेल्या गीतांना राष्ट्रीय पारितोषिक विजेता शैलेंद्र बर्वे यांचे संगीत व पार्श्वसंगीत लाभले असून सोनू कक्कर, प्रवीण कुवर, प्रसन्नजीत कोसंबी, विवेक नाईक यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

या चित्रपटाची गाणी मी पाहिली आहेत. मुळात त्या गाण्यांचे शब्द खूप चांगले आणि अर्थपूर्ण आहेत. कुठल्याही चित्रपटात संगीत या गोष्टीला खूप महत्व आहे. तौफिक कुरेशी यांनी “मला मिळेल ना सिनेमाचे तिकीट ?”असा मिश्किल प्रश्न विचारून सर्वांची मने जिंकली. ‘डोंबिवली रिटर्न’मध्ये प्रमुख भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी साकारत असून ते या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत.माझ्या मनात चित्रपट निर्मिती करावी असे खूप वर्षांपासून मला वाटत होते. मी अनेक चित्रपटात काम केले तेव्हा जाणवले की चित्रपट चांगला होण्यासाठी सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. अनेकदा असे होते की सर्व कलाकारांनी जीव ओतून काम केलेले असते पण ती कलाकृती काही कारणास्तव लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे चांगला निर्माता असणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. माझा मित्र महेंद्र तेरेदेसाईंकडे एक गोष्ट होती, ती त्याने मला ऐकवली आणि मला ही ती कथा मला आवडली आणि मी निर्माता व्हायचं ठरवलं असे निर्माता, अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह हृषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटील आदींच्या भूमिका आहेत. उदयसिंग मोहिते यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून योगेश गोगटे यांचे संकलन आहे. ध्वनी रेखांकन राष्ट्रीय पारितोषिक विजेते अनमोल भावे यांचे आहे. येत्या 22 फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे