श्रद्धांजली…नव्हे `सुरांजली’!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

पु. ल. देशपांडे अकादमीत मिनी थिएटरमध्ये चाललेल्या `सूरसाधना’ या कार्यक्रमात शैलेश भागवत यांचे सनईवादन आणि नंदू होनप यांचे व्हायोलिनवादन अशी जुगलबंदी सुरू होती. कार्यक्रम ऐन टिपेला गेल्यानंतर होनप यांनी त्यांचे अत्यंत लोकप्रिय असे, `निघालो घेऊनि दत्ताची पालखी’ हे गीत वाजविले. त्यानंतर पुढे `दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ व्हायोलिनवर वाजविण्यास सुरुवात केल्यानंतर, त्यांचे भान हरपले आणि अशी सूरसमाधी लागली असतानाच, ते अचानक कोसळले…तो हृदयविकाराचा तीव्र धक्का होता. त्यातच होनप यांना देवाज्ञा झाली. तो दिवस होता १८ सप्टेंबर २०१६. ह्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होईल. त्या दिवशी होनप ह्यांना श्रद्धांजली न वाहता सुरांजली वाहावी, या विचाराने होनप ह्यांचे सुपुत्र स्वरूप होनप ह्यांनी `सारे संगीतकार’ ह्या गीताची निर्मिती केली आणि लोकप्रिय कवी आणि लेखक प्रवीण दवणे ह्यांचे सुपुत्र आदित्य दवणे ह्यांनी पहिल्यांदाच गीतलेखन केले.

सुरांजली ही कल्पनाच मुळाच अनोखी आहे, पण त्यातही वेगळेपण जपत स्वरूप ह्यांनी एका दिग्गज संगीतकाराला अन्य संगीतकारांच्या आवाजातून सुरांजली वाहण्याचा निश्चय केला. चार पिढ्यांतील आठ कलाकार जे आपल्याला संगीतकार म्हणून परिचित आहेत ते गायक म्हणून सादरीकरण करणार आहेत, तर जे गायक असूनही संगीतकार आहेत, त्यांचेही सुरेल गाणे ह्या स्वरमैफलीत आपल्याला ऐकता येणार आहे.

पंडित यशवंत देव, पंडित सुरेश वाडकर, पंडित अजित कडकडे, अशोक पत्की, श्रीधर फडके, अवधुत गुप्ते, नीलेश मोहरीर आणि वैशाली सामंत हे आठ संगीतकार हे गाणे सादर करणार आहेत. या गाण्यामध्ये ग्रुप व्हायोलिन्स, सितार, तबला, मेंडोलीन अशा अॅकॉस्टिक वाद्यांचाही वापर करण्यात आला आहे. या गाण्याचे संगीत संयोजन सुराज साठे व ताल संयोजन प्रमोद साने यांनी केले आहे. तसेच पं. उमाशंकर शुक्ला, माधव पवार, जितेंद्र जावडा आणि ग्रुप व्हायोलिन, विलास जोगळेकर, ज्ञानेश देव, विजय जाधव, प्रभाकर मोरे, राज शर्मा, अशोक वोरा, बिनॉय सिंग, रोहन चवाथे, रॉनी सातमकर अशा मातब्बर वादकांचा या गाण्यास हातभार लागला आहे. या गाण्याचे ध्वनिमुद्रण अवधूत वाडकर (आजीवासन साऊण्ड्स) यांनी केले आहे.

सदर गाणे दिग्गज संगीतकारांकडून गाऊन घेणे, हे स्वरूप आणि आदित्य ह्यांच्यासाठी आव्हान होते. ह्याबाबत प्रवीण दवणे सांगतात, `ही सर्व मंडळी केवळ नंदू होनप ह्यांच्याप्रती आदर असूनही केवळ त्यांच्या प्रेमापोटी येणारी नाहीत, तर ते सर्वजण दर्जेदार कलावंत आहेत. त्यांनी हे गाणे तावून सुलाखून घेतले आणि त्यांना ते भावले म्हणून त्यांनी होकार दिला. दोघांची मेहनत कामातून स्पष्ट दिसते. ह्यातून काही उत्पन्न नसताना संगीतसेवेसाठी पदरमोड करून दोघांनी घेतलेले कष्ट मला विशेष वाटतात. आजवर गायक, कवी एकत्र आलेत, परंतु संगीतकार एकत्र आलेले नाहीत. त्यादृष्टीनेही हे गाणे ऐतिहासिक ठरणार आहे. नंदू देहरूपाने गेल्यामुळे मला वाटले होते की सगळे साकळणार की काय! मात्र ह्या दोघांमुळे माझ्यातल्या सृजनशील पित्याला आनंद झाला आहे.’

great-music-director-nanduसुप्रसिद्ध संगीतकार नंदू होनप आणि लोकप्रिय कवी प्रवीण दवणे हे दोघे म्हणजे, जशा नाण्याच्या दोन बाजू, तशा गाण्याच्याही दोन बाजू! ह्या द्वयींनी चार दशकांहून जास्त काळ एकत्र काम केले. हजारो गाण्यांची निर्मिती केली. गेल्या वर्षी नाण्याची एक बाजू रिक्त झाली. मात्र आता त्यांची पुढची पिढी संगीत क्षेत्रातील आव्हान स्वीकारण्यास कटिबद्ध झाली आहे.
`सारे संगीतकार’ ह्या गीताबद्दल सविस्तर माहिती देताना स्वरूप सांगतात, `ह्या गीताच्या चाली माझ्या असल्या तरी, जे संगीतकार ते गाणे गाणार आहेत, त्या संगीतकारांच्या बाजाप्रमाणे संगीत बांधण्याचा मी प्रयत्न केला आहे. देव काकांसमोर जेव्हा हा प्रस्ताव मांडला, तेव्हा त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सांगितले, `मी आधी शब्द वाचणार, चाल ऐकणार आणि दोहोंचा मेळ रुंजी घालणारा असेल, तरच गाणार!’ खुद्द देवाने परीक्षा घ्यावी आणि आम्ही नवोदित कलाकारांनी ती यशस्वीपणे उत्तीर्ण करावी, ह्याचा आम्हाला आनंद आहे. देवकाकांप्रमाणे अशोक पत्की, श्रीधर फडके, अजित कडकडे, सुरेश वाडकर ह्या शब्द आणि सुरांशी यत्किंचितही `कॉम्प्रोमाइज’ न करणाऱ्या मंडळींनी देखील गाण्याला हिरवा कंदिल दिला.’

तर गीतकार आदित्य सांगतात, `ह्या सर्व संगीतकारांच्या गाण्यांचा बाज लक्षात घेता, मी गीतलेखन केले. उदा. श्रीधरजी `ष’ ह्या अक्षराचा विशेष उल्लेख करतात, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी लिहिलेल्या कडव्यात `आयुष्य’ हा शब्द गुंफून खास `श्रीधरजी टच’ दिला आहे. अशोक पत्की ह्यांच्यासाठी भावस्पर्शी शब्द, अजित कडकडे ह्यांच्यासाठी आध्यात्मिक भाव असलेले शब्द, अवधूत गुप्ते ह्यांच्यासाठी रॉक स्टाईल शब्द, तर नीलेश मोहरीर ह्यांच्यासाठी हळुवार प्रेमभावना निर्माण करणारे शब्द रचले आहेत.’

हे गाणे संगीत क्षेत्रातील कलाकारांनाच नाही, तर प्रत्येक रसिकाला भुरळ घालणार आहे, अशी खात्री त्या दोघांना वाटते. सदर गाण्याच्या निमित्ताने त्या दोघांचा हा पहिलाच एकत्र प्रयत्न असला, तरी त्या दोघांची आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख आहे.

स्वरूप ह्यांनी पाश्चात्य संगीताचे प्रशिक्षण घेतले असून वडिलांच्या सांगण्यानुसार सुप्रसिद्ध संगीतकार बाळ साठे ह्यांच्याकडे भारतीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. गेल्या दहा वर्षांपासून ते लंडन ट्रिनिटी संगीत अकादमीत प्रशिक्षक आहेत. तिथे ते कीबोर्ड आणि पियानो शिकवतात. ही अकादमी परदेशात असली, तरी त्यांचे काम मुंबईतूनच चालते. त्यांनी अनेक चित्रपटाला पार्श्र्वसंगीत, तसेच जाहिरातींसाठी जिंगल्सला चाली लावल्या आहेत. तसेच ते जादूगार आहे. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून आजतागायत २५०० जादूचे प्रयोग केले आहेत. ते ह्या कलेचे प्रशिक्षण वर्गही घेतात.
तर, आदित्य दवणे हे वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत लेखक आणि कवी म्हणून ओळख निर्माण करीत आहेत. ठाण्यातील महाविद्यालयात ते व्यवस्थापन विषयाचे अध्यापन करतात. काव्य वाचनाचे कार्यक्रम करतात. दासबोधाचे निरुपण करणारे `युवा बोध’ हे त्यांचे सदर वृत्तपत्रात वर्षभर सुरू होते. आपल्या लेखणीच्या आधारावर त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. `सारे संगीतकार’ ह्या उपक्रमातून पहिल्यांदाच त्यांची कविता गाण्याच्या स्वरूपात आकार घेणार आहे.

swarup-honap

कमी वेळात जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी यू ट्यूबवर SNH MUSIC नामक चॅनेलवर गाण्याचे प्रकाशन होणार आहे. दरम्यान, ह्या उपक्रमासंबंधित मुलाखती, गाण्याची झलक, फोटो सोशल मीडियावर टाकून ह्या दोन्ही कलाकारांनी रसिकांची उत्कंठा वाढवली आहे.

आज एकही असे देवस्थान नाही, जिथे होनप ह्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी वाजवली जात नाहीत. त्यांनी संगीत क्षेत्रासाठी भरपूर योगदान दिले आहे. संगीत क्षेत्रात नंदू होनप ह्यांचे नाव यापूर्वीही आदराने घेतले जात होते आणि पुढेही घेतले जाईल. ह्या उपक्रमातील सहभागी सर्वच कलाकारांनी होनप ह्यांच्यासोबत काम केलेले आहे. आता तेच कलाकार त्यांच्या मुलासोबत काम करून नंदू होनप ह्यांना स्वरपुष्प वाहणार आहेत, जे सदासर्वकाळ टवटवीत राहील आणि रसिकांच्या ओठावर राहील.
आदित्य आणि स्वरूप ह्यांनी पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर मारल्याने संगीतसृष्टीच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि ते दोघेही ते आव्हान पेलू शकतील अशी आशा आहे. त्या दोहोंना शुभेच्छा!