पुन्हा सजणार ‘नक्षत्रांचे देणे’, स्नेहल भाटकर यांना जन्मशताब्दी निमित्त सांगीतिक आदरांजली

6

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठीतील नाट्य, संगीत, साहित्य आदी कलांमधील निवडक रत्ने निवडून त्यांच्या जीवनाचा आणि कारकिर्दीचा समग्र आढावा गाण्यांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आणणाऱ्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाला अमाप लोकप्रियता मिळाली असून या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात. स्नेहल भाटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या झळाळत्या कारकिर्दीचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात आला. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केलं. या महान संगीतकाराला भावपूर्ण आदरांजली म्हणून हा कार्यक्रम येत्या रविवारी २७ जानेवारीला झी मराठीवरून संध्याकाळी ७ वा. प्रसारित करण्यात येणार आहे.

स्नेहल भाटकर हे संगीतकार म्हणून श्रेष्ठ होतेच, पण माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. एवढे मोठे संगीतकार असूनही त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांनी चाळीच्या वातावरणात, गोंगाटात राहत असतानाही एकाहून एक सुंदर चाली दिल्या. स्नेहल भाटकर यांची गाणी पाकिस्तानमध्ये लोकप्रिय होती आणि त्यांना पाकिस्तानातून पत्रेदेखील यायची. संगीत हे संगीत असते, त्याला धर्म नसतो, देश नसतो, असं त्यांचं मत होतं.

संगीतकार स्नेहल भाटकर यांची भजनीबुवा, नाट्यसंगीताला चाल लावणारे संगीतकार, उडत्या चालींनाही आपलेसे म्हणणारे संगीतकार, दिग्गज गायकांकडून गाणी गाऊन घेणारे संगीतकार, मेट्रोमध्ये झळकलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे संगीतकार, हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान मिळवलेले संगीतकार अशी अनेक रूपे ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचतील. यामुळे विस्मरणात गेलेली त्यांची अनेक गाणी रसिकांच्या मनात पुन्हा रेंगाळू लागतील यात शंकाच नाही.