जैन मुनींना मुस्लिमांची शिवीगाळ

सामना ऑनलाईन । कळमनुरी

शहरात धर्मांध मुस्लिमांनी जैन मुनी व जैन समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवून ‘या रस्त्याने जाऊ नका’, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केल्याची घटना सकाळी ८ वाजता घडली. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात दोघांसह इतर काही मुस्लिमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी येथे जैन मुनी विशेषसागर महाराज हे वास्तव्यास आहेत. सकाळी ८ वाजता जैन मुनी हे शुध्दीसाठी मंदिरातून संजय बुर्से यांच्या शेताकडे जात होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल ओमप्रकाश मेणे, अभिनंदन बनसकर, शिवा शिंदे, संघर्ष सोवितकर हे देखील होते. शुध्दीचा विधी आटोपल्यानंतर जैन मुनी व कार्यकर्ते बागवान गल्लीमार्गे जैन मंदिराकडे जात होते. त्यावेळी असोलखान्यासमोर सार्वजनिक रस्त्यावर इम्तियाज कुतुब बागवान आणि हिराजी बागवानचा मुलगा (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांसह इतर काही मुस्लिमांनी मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून रस्ता अडवत या मार्गाने जाऊ नका, पुन्हा गेल्यास अंडी फेकून मारू, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी तातडीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, कळमनुरी येथे वास्तव्यास असलेले जैन मुनी विशेष सागरजी महाराज हे दिनचर्या पार पाडण्यासाठी जात असताना मागील तीन-चार दिवसांपासून मुस्लिम समाजकंटकांनी त्यांना शिवीगाळ केली आहे. सकाळी महाराजांना अश्लिल शिवीगाळ केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात हिंदू व जैन समाजातर्फे निषेध व्यक्त होत आहे. समाजकंटकांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. या शिष्टमंडळात युवासेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घुगे, नगरसेवक श्रीराम बांगर, सुभाष बांगर, गोपाल अग्रवाल, रामेश्वर शिंदे, उध्दवराव गायकवाड, बालाजी घुगे, संतोष गोरे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.