”एमयूटीपी-3”च्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन एमएमआरडीए करणार, अतिक्रमणधारकांचीही चांदी होणार

5


सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत 10 हजार 497 कोटी रुपये खर्च करून मुंबई नागरी परिवहन टप्पा तीन (एमयूटीपी 3) हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जागा उपलब्ध होण्यासाठी एखाद्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालेले असल्यास अतिक्रमणधारकांना जागा व बांधकामाचा खर्चही मिळणार आहे.

एमयूटीपी टप्पा तीन प्रकल्पाअंतर्गत विरार-डहाणूदरम्यान रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण, कर्जत-पनवेलदरम्यान नवीन उपनगरीय रेल्वेसाठी मार्गिका टाकणे, ऐरोली- कळवा दरम्यान उन्नत(एलीवेटेड) रेल्वे मार्ग बांधणे, नवीन रेल्वे गाडय़ा खरेदी, मध्य व पश्चिम रेल्वेच्या विभागात ट्रेस पास कंट्रोल( प्रवाशांनी रूळ ओलांडू नयेत म्हणून संरक्षण भिंत) व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा एक व टप्पा दोन प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर टप्पा तीन प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पन्नास टक्के खर्च रेल्वे मंत्रालय तर पन्नास टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. ही पन्नास टक्के रक्कम सिडको व एमएमआरडीमार्फत उभारण्यात येईल.

अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा

या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होणे अतिशय गरजेचे आहे सरकारच्या अनेक जमिनींवर अनेक अतिक्रमणे आहेत. या जमीनीवर अतिक्रमण केले असल्यास अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा व बांधकामापोटी मोबदल्याची रक्कम रोखीच्या स्वरुपात देण्याबाबत राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पग्रस्तांचे एमएमआरडीएमार्फत पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या