मुजफ्फरनगर :देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड, मोठा फौजफाटा तैनात

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुजफ्फरनगर

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये हिंदू मंदिरातील देव-देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होणाऱ्या या कृत्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नशेमध्ये धुंद तरुणाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खतोली येथील आहे. नशेमध्ये धुंद तरुणाने एका मंदिरामध्ये प्रवेश करत भगवान शिव आणि पार्वतीच्या मुर्तींची तोडफोड केली. ही घटना पसरताच परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी सर्कल ऑफिसर राजीव कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. शहरातील देवीदास भागामध्ये हे मंदिर आहे. स्थानिक लोकं पुजा-अर्चा करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर मूर्तिची तोडफोड झाल्याचे समोर आले. त्यानंतर परिसरात लोकं जमा होण्यास सुरुवात झाली आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. संतप्त जमावाचा रोष वाढण्यापूर्वी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

धार्मिक वाद आणि मुजफ्फरनगर
मुजफ्फरनगरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी फेब्रुवारी २०१८मध्ये येथे तणाव निर्माण झाला होता. एका मुलीचे भेटण्यासाठी आलेल्या मुलाला काही लोकांनी मारहाण केली होती तसेच त्याची दुचाकी आगीच्या हवाली केली होती. त्यानंतर परिसरात दोन धर्मांमध्ये तणावाचे वातावरण होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिसांना मोठा संघर्ष करावा लागला होता.