माझा मुलगा झोरो

अंशुमन विचार anshuman.vichare @gmail.com

अभिनेत्री अदिती सारंगधर… तिचा मोठा मुलगा झोरो याच्याविषयी बोलताना खूप भावूक होते.

मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात… मन नाजूकशी मोतीमाळ… हे शब्द मला नेहमी भावतात. कारण ज्याला या मनाच्या गुंतागुंतीची नाजूक मोतीमाळ ज्याच्यात गुंफता आली तो खऱया अर्थाने आयुष्य जगायला शिकला असं मला वाटतं. कसं आहे ना… माणूस भौतिक सुखाच्या पूर्ततेसाठी खूप ठिकाणी मरमर करत असतो, पण आत्मिक सुखासाठी नक्की कुठल्या दिशेने प्रयत्न करायला हवेत याची दिशा काही केल्या सापडत नाही. म्हणून वर म्हटल्याप्रमाणे ज्याला ही नाजूक मोतीमाळ सापडली तो ग्रेट… अर्थात ती तुमच्या जिवलगातच सापडते नाही का…

अदिती सारंगधर… आजची आघाडीची अभिनेत्री. तुम्ही तिला कित्येक मालिका, सिनेमांतून, नाटकांतून पाहत असाल. पण मी तिला पहिल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेपासून ओळखतो. खूपच एनर्जिटिक, दिलखुलास, आतबाहेर काहीही नसलेली… पण मला बऱयाचदा तिच्यात एक कणखर व्यक्तिमत्त्व दिसलंय. तिला कधीच निराश, रडताना पाहिलं नाही. अशा अदितीकडे झोरो नावाचा लॅब्रिडॉल कुत्रा आहे. सॉरी… तिच्या मते तिचा पहिला मुलगा. तिला आता गोंडस बाळ पण झालंय, पण तरीही झोरो हा तिचा पहिला मुलगाच आहे.

तिचं म्हणणं आहे की, माझा अरिन… माझा मुलगा… तो थोडय़ा दिवसांनी बोलू शकतो, भांडू शकतो, हट्ट करू शकतो, पण माझ्या झोरोला तसं व्यक्त होता येणार नाही… आणि त्याची अपेक्षा काय, तर फक्त प्रेम, खूप खूप प्रेम… बाकी काही नाही. खरं म्हणजे साडेसहा वर्षांपूर्वी माझ्या नवऱयाने छोटं पिल्लू आणलं तेव्हा मला खूप आनंद झाला. मग दिवसभर त्याच्याशी टाइमपास केला आणि म्हटलं, आता त्याला सोडून ये हां… त्यावर नवरा बोलला, ‘‘नाही… हा आता येथेच राहणार’’. मी गप्प. कारण याआधी ज्यांच्याकडे कुत्रे असायचे त्यांच्याकडे मी जायचेही नाही, पण नवऱयापुढे कोण बोलणार… असो. पण त्या झोरोमध्ये आम्ही रमायला लागलो. तो आमच्यासोबत आमचा बेड शेअर करायचा, पण आता माझा मुलगा अरिन आल्यावर त्याला काही दिवस बेडमध्ये येऊ द्यायचो नाही. अर्थात डॉक्टरी सल्ल्यामुळे… आधी झोरो रुसला, पण नंतर त्याने सगळं ऍक्सेप्ट केलं.

झोरो खूपच लव्हेबल आहे. त्याला उकडलेल्या भाज्या खूप आवडतात. त्याच्यासाठी असं वेगळं जेवण केलं जातं… आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या ताटातला एक घास तरी त्याला द्यावाच लागतो. त्याला बॉलबरोबर खेळायला खूप आवडतं. पण कधी कधी तो अरिनचा बॉल घेतो. मग दोघांत भांडण सुरू… आता तो खूपच समजूतदार झालाय. फक्त स्वतःच्या बॉलबरोबरच खेळतो. अरिनच्या बॉलला हातसुद्धा लावत नाही. त्याला बाहेर फिरायला घेऊन जायला त्याची खास गाडी आहे. म्हणजे मी शूटिंग करून लवकर घरी आले किंवा घरी असले की, पूर्णवेळ झोरोसाठी असतो. मग मज्जाच असते.

त्याचा समजूतदारपणा ग्रेटच… मी जेव्हा खूपच डिप्रेस होते… म्हणजे कौटुंबिक, कामाचा ट्रेस या अनेक गोष्टींमुळे मी खूप रडायचे तेव्हा झोरो मला येऊन चाटायचा… कसं माहीत नाही… त्याला माझ्या भावना कळायच्या…

आता तर कधी कधी भीती वाटते… कारण झोरो हा कधीतरी जाणार… पण त्यानंतर कधीच मी कुत्रा पाळणार नाही. कारण झोरोची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे अंशू, आपल्याला कामासाठी किंवा भौतिक स्वार्थासाठी इंटरेस्ट असतो. पण झोरोला फक्त निव्वळ प्रेमासाठी आपल्यात इंटरेस्ट असतो. आम्ही बाहेर जाताना तो खिडकीत येऊन टाटा करतो. जर आपण तो टाटा नाही केला तर संध्याकाळी काही खरं नाही.

झोरोशिवाय आयुष्य हा मी विचारच करू शकत नाही. कारण तो माझ्या आयुष्याचाच अविभाज्य भाग आहे.

तुम्हाला सुरुवातीच्या ओळींची आता ओळख पटली असेल ना… मला नेहमी वाटतं, आपण बातम्या बघतो, हिंसाचाराच्या, बलात्काराच्या, चोरीच्या… पण यापैकी एकही बातमी आपल्याच काय, कुठल्याही प्राण्यांना लागू होत नाही. कारण गरजा… आपण आपल्या गरजा नेमक्या काय आणि किती आहेत हेच विसरत चाललोय… आणि सुखाच्या नवीन कल्पनांमध्ये वाहवत चाललोय… असो. पण खरं सांगू, या निष्पाप जिवलगांपासून काहीतरी शिका… अन्यथा काही खरं नाही.